ठाकुर्ली परिसरातील बारा बंगला भागातील मध्य रेल्वेच्या ६५ एकर जमिनीवरील २५० झाडे मैदानासाठी तोडण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. या भागातील निसर्गप्रेमी नागरिकांमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही वनराई तोडू नये यासाठी कल्याण, डोंबिवली परिसरातील पर्यावरणप्रेमींचा एक मोठा गट सक्रिय झाला असून याविषयी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी मोठमोठय़ा योजना राबवल्या जात असताना मध्य रेल्वे प्रशासन वनराई नष्ट करीत असल्याने या विषयाची केंद्रीय पर्यावरण, रेल्वे मंत्र्यांकडे तक्रारी करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर आहे. या समितीने पर्यावरणाला घातक ठरणारा हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून करण्यात येणार आहे.
बारा बंगला परिसर हा डोंबिवलीतील एकमेव हरितपट्टा आहे. शहरातील उर्वरित सर्व जमिनी सीमेंटच्या जंगलांनी व्यापल्या आहेत. नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळावी आणि रेल्वेने त्यांच्या कल्याण, लोणावळा, कुर्ला येथील जागेवर त्यांचे प्रकल्प राबवावेत, अशी मागणी या भागातील रहिवासी व्यक्त करू लागले आहेत. ठाकुर्ली पश्चिमेत चोळे येथे ऊर्जा विभागाची पडीक जागा आहे. तेथे नियोजित प्रकल्प राबविणे शक्य आहे. ठाकुर्लीतील हरितपट्टय़ावर कुहाड चालवू देणार नाही, अशी भूमिका आता पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीत आपण या प्रस्तावाला विरोध करणार आहोत, असे ठाकुर्ली-चोळेचे भाजप नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी सांगितले.
वृक्ष समिती सदस्य वृक्षप्रेमी मनोज वैद्य, ‘एमआयडीसी’ निवासी संघाचे राजू नलावडे, पर्यावरणप्रेमी प्रमोद दलाल, सचिन जोशी, संजय हिरासकर, राजन जोशी अशा अनेक नागरिकांनी रेल्वेच्या या कृतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून वृक्षतोडविरोधी मोहिमेत सहभागी होण्याची तयारी केली आहे. यासंबंधी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या भूमिकेविषयी सडकून टीका केली. उच्चपदस्थ महापालिका अधिकाऱ्यांचा या वृश्रतोडीला पाठिंबा असल्याची टीका चौधरी यांनी केली.
बारा बंगलातील वनराई
ठाकुर्लीतील बारा बंगला भागात रेल्वेची ६५ एकर जमीन आहे. शंभरहून अधिक वर्षे वयोमान असलेले वड, पिंपळ, आंबे असे वृक्ष या जागेवर आहेत. पन्नासहून अधिक प्रकारचे महाकाय वृक्ष या ठिकाणी आहेत. १ हजार ३८ वृक्षांची येथे नोंद आहे. ‘रेल्वे सुरक्षा विशेष पथकाच्या’ ताब्यात हा परिसर आहे. गेल्या वर्षी या वनराईतील ६३ झाडे तोडून तेथे कवायत मैदान तयार केले. या वेळी २५० झाडे तोडून अॅथलेटिक्स, हॉकीचे मैदान तयार करण्यात येत असल्याचे बोलले जाते. २५० झाडे तोडण्याच्या प्रस्तावात जुनाट वड, पिंपळ झाडांचा उल्लेख गुपचूप करण्यात आला आहे, असे एका समिती सदस्याने सांगितले.