केंद्रीय पर्यावरण अहवालानुसार राज्यात दुसऱ्या आणि देशात दहाव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी डोंबिवलीची बदनाम ओळख पुसून टाकण्याच्या उद्देशाने शहरातील ‘कोकण युवा प्रतिष्ठान’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी डोंबिवली शहराला ‘सायकल सिटी’ बनवण्याचे उद्दिष्ट या संस्थेने आखले आहे. जानेवारी २०१५ मध्ये व्यापक सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करून या मोहिमेचा शुभारंभ ही संस्था करणार आहे.
डोंबिवली शहरात कार्यरत असलेली कोकण युवा प्रतिष्ठान संस्था गेल्या चार वर्षांपासून शहरामध्ये विविध सामाजिक कार्य करते. संस्थेच्या वतीने डोंबिवली शहरातील प्रदूषणाचा व्यापक अभ्यास सुरू असून प्रदूषणकारी कंपन्यांचा त्रास शहराला होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहनांच्या माध्यमातून होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणही अधिक आहे. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी शहरातील एक मोठी समस्या आहे. अरुंद रस्त्यांवर एकाच वेळी येणारी वाहने रोखण्यासाठी आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल या वाहनाचा चांगला पर्याय म्हणून उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सायकल चालवणे हे शहरातील नागरिकांच्या मनात िबबवण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी सायक्लोथॉन स्पर्धा २०१५ चे आयोजन करण्यात आले असून यापुढे ‘सायकल सिटी डोंबिवली’ या मोहिमेला गती देण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्य़ातील सुमारे दोन हजारांहून अधिक सायकलप्रेमी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये २४ ते २६ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय चाळके यांनी दिली.  
 सायकल सिटी डोंबिवली..
सायकल सिटी डोंबिवली या उपक्रमाची घोषणा संस्थेच्या वतीने केली असून जानेवारीमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. शहरातील सायकल क्लब, सायकलप्रेमींचे संघटन करण्यात येणार आहे. डोंबिवली-दिल्ली, डोंबिवली-कन्याकुमारी अशा लांबच्या मोहिमा पूर्ण करणारे सायकलपटू निखिल माने यांच्यासह सायकलवरून लांबचा प्रवास करणाऱ्या सायकलपटूंची शहरवासीयांना ओळख करून देण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक तरुण शहरात फिरताना दुचाकीऐवजी सायकलला पहिले प्राधान्य देईल अशी स्थिती निर्माण करण्याचा ‘कोकण युवा प्रतिष्ठान’चा मानस आहे.
प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न हवेत..
२०११ मध्ये प्रदूषणामध्ये देशात १४ व्या क्रमांकावर असलेले डोंबिवली शहर दहाव्या क्रमांकावर आल्याने प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे. हिरव्या पावसाने डोंबिवलीकरांची झोप उडवली आहे. ‘आज नाही तर कधीच नाही’ अशी परिस्थिती डोंबिवली शहरावर उद्भवू नये यासाठी सायकल वापर अधिक व्यापकपणे होण्याची गरज आहे. हे शहर सायकलयुक्त झाल्यास प्रदूषण काही अंशी घटू शकते, म्हणूनच संस्थेने हा उपक्रम आयोजित केल्याचे संस्थेचे दिनेश मोरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ride cycle lower pollution
First published on: 28-10-2014 at 06:48 IST