महालोक अदालतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत राज्यात एकूण सात लाख प्रकरणांपैकी दोन लाख प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. पक्षकारांना महालोक अदालतीच्या माध्यमातून कमी वेळात, कमी खर्चात पारदर्शीपणे व समाधानकारक न्याय मिळत असल्याने पक्षकारांनी आपली प्रकरणे महालोक अदालतीच्या माध्यमातून सोडवून घ्यावीत, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी येथे केले.
येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे आणि नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अविनाश गुंजोटीकर अध्यक्षस्थानी होते. वाशीमचे जिल्हा सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, वाशीम वकील संघाचे अध्यक्ष श्यामराव उंडाळ उपस्थित होते.
यावेळी न्यायमूर्ती शाह म्हणाले, दवाखान्याप्रमाणेच न्यायालयेही लोकांची सेवा करण्याचे काम करतात. राज्यातील न्यायालयांच्या इमारती दुरुस्ती व बांधणीसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या माध्यमातून न्यायालयाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होतील. १९९८ मध्ये स्वतंत्र वाशीम जिल्ह्य़ाची निर्मिती झाली तेव्हापासूनच येथे स्वतंत्र जिल्हा न्यायालयाची मागणी होती. ती आज पूर्णत्वाला गेली आहे.
या माध्यमातून पक्षकारांना गतिमान, पारदर्शक व कमी पैशात न्याय मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी म्हणाले, वाशीमला अनेक नामवंत विधिज्ञांचा वारसा आहे.
वाशीमला ऐतिहासिक वारसा आहे. येथे झालेल्या स्वतंत्र जिल्हा न्यायालयामुळे येथील जनतेला चांगली सुविधा उपलब्ध झाली असून वाशीमच्या न्यायदानाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे, असे न्या. अविनाश गुंजोटीकर यावेळी म्हणाले. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. श्रीखंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन येथील तद्र्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश वली मोहम्मद, न्या. डी.आर. देशपांडे यांनी केले. येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. अनुप बाकलीवाल यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकबर पठाण, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक सुनील शुकरे,  नागपूर खंडपीठाचे महाप्रबंधक रुोही, वरिष्ठ न्यायाधीश सुनील चौंदते, न्या. एम.आर. खानवे,
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. पाडेवार, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. बी.के. गांधी, अ‍ॅड. आशीष देशमुख, अकोला वकील संघाचे  अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश वखरे, अ‍ॅड, छाया मवाळ, मंगेश सावजी यांच्यासह जिल्ह्य़ातील विधिज्ञ, निमंत्रित  आणि  पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.