येथील बसस्थानक मार्गावरील उस्मानिया मशिद भागात घडलेल्या एका वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नवीन माहिती समोर आली असून ,या महिलेचा मृत्यू ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. या महिलेच्या घरातून सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे.
गुरुवारी सायंकाळी उस्मानिया मशिदीजवळील वसाहतीत राहणाऱ्या पुतूल बोस या ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून ऐवज लुटला आणि त्यांची हत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले होते, पण शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून पुतूल बोस यांचा मृत्यू ह्रद्यविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी सांगितले. त्यांच्या घरातून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. पुतूल बोस या बेरार ट्रस्टच्या वसाहतीत एकटय़ात राहत होत्या. येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी अश्विनी मेश्राम ही विद्यार्थिनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून पेइंग गेस्ट म्हणून त्यांच्याकडे राहते. गुरुवारी सायंकाळी ती महाविद्यालयातून परतल्यानंतर एका खोलीत पुतूल बोस यांचा मृतदेह तिला दिसला. या घटनेची माहिती पुतूल बोस यांच्या कन्या नीता बकूल कक्कड (रा. कॅम्प, अमरावती) यांना देण्यात आली होती.
प्रथमदर्शनी हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पुतूल बोस यांच्या तोंडातून रक्त आलेले दिसल्याने संशयाला बळकटी मिळाली होती. गुरुवारी रात्रीच शवविच्छेदन करण्यात आले. त्यात ह्रद्यविकाराची बाब स्पष्ट झाली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. बोस यांच्या शरीराला कोणतीही दुखापत झाल्याचे आढळून आलेले नाही. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत या महिलेचा मृत्यू झाला असावा, असाही संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. दरोडेखोरांनी घरातील मागील भागातून प्रवेश करून घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम पळवली आणि त्यांच्या अंगावरील दागिनेही काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.