उपाहारगृहात मदतनीसाच्या भूमिकेत वावरणारा ‘चहावाला’.. पाणी भरून आणणारा ‘जलदूत’.. अशी विविध कामे करण्याची क्षमता राखणारे ‘रोबोट’ साकारतानाच दुसरीकडे मंदिरात वाद्य व घंटी स्वयंचलित पद्धतीने वाजविण्याची प्रत्यक्षात आणलेली अनोखी संकल्पना.. हवेच्या दाबावर उडणारे रॉकेट.. ही यंदाच्या ‘सायन्स फेस्टिव्हल’ची मुख्य वैशिष्टय़े ठरली. शालेय विद्यार्थ्यांनी लढविलेल्या अशा विविध संकल्पनांना नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच विज्ञानाच्या क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना साध्यासोप्या पद्धतीने समजावून देण्यास या महोत्सवाने महत्त्वाचा हातभार लावल्याची प्रतिक्रिया शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्गात उमटली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने विज्ञान प्रबोधिनीच्या वतीने ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम राबविला जातो. इयत्ता तिसरी व चवथीतील विद्यार्थ्यांसाठी साडेतीन महिने, तर इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी सहा महिने या कालावधीत विज्ञानाचे विविध प्रयोगांद्वारे धडे दिले जातात. शिक्षणक्रमाच्या अखेरच्या सत्रात विद्यार्थ्यांना आपापल्या संकल्पनांद्वारे वैज्ञानिक प्रकल्प साकार करण्याची संधी दिली जाते. शालेय विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक आविष्कारांचे प्रतिबिंब यंदाच्या महोत्सवात उमटले. प्रदर्शनाचे यंदाचे हे तिसरे वर्ष. पाचदिवसीय प्रदर्शनात शेकडो विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी भेट देऊन बाल वैज्ञानिकांनी मांडलेल्या संकल्पनांना दाद दिली. संडे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले प्रयोग, प्रात्यक्षिके व प्रकल्प असे या महोत्सवाचे स्वरूप होते. त्यात वैयक्तिक व सामूहिकरीत्या साकारलेल्या प्रयोगांनी सर्वाना आश्चर्यचकित केले.
महोत्सवाचे उद्घाटन वैज्ञानिक थाटातच झाले. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी युद्धात वापरल्या जाणाऱ्या तोफेच्या तंत्रज्ञानाचा उलगडा होण्यासाठी तिची निर्मिती केली होती. या तोफेतून रंगीत बॉल डागून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नाशिक पालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मेजर (निवृत्त) पी. एम. भगत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नानाविध काम करण्याची क्षमता असलेल्या रोबोटची निर्मिती केली. उपाहारगृहात मदतनीसाचे (वेटर) काम करणारा हॉटेल रोबोट हा त्यापैकीच एक. हॉटेलमध्ये पाणी व चहा देण्यासह इतर कामे तो करू शकतो.  त्याचे ‘चायवाला’ असे नामकरण केले. निवडणुकीच्या प्रचारात चहावाला हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. बहुधा त्यामुळे या रोबोटचे नामकरणही तसे करण्यात आले. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी वाहून नेऊ शकणारा ‘जलदूत’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हवेत फुगे सोडू शकणारी सोप बबल यंत्रणा, सोलर बॅकपॅक, हवेच्या दाबावर उडणारे रॉकेट, हायड्रॉनिक जेसीबी, सौरमाला, न्यूटन्स क्रॅडल असे प्रकल्प मांडण्यात आले होते.
मंदिरात आरतीच्या वेळी विविध वाद्ये व घंटा वाजविली जाते. ही सर्व वाद्ये व घंटा स्वयंचलित पद्धतीने वाजविण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या एका गटाने साकारली. मनुष्यबळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कामगिरीची क्षमता असणारे रोबोट विद्यार्थ्यांनी तयार केले. याबाबतची माहिती स्कूलच्या चैताली नेरकर यांनी दिली. प्रदर्शनादरम्यान ‘विस्मयकारी ब्रह्मांड’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. विज्ञान व गणिताचे तज्ज्ञ शिक्षक भा. स. भामरे यांनी मार्गदर्शन केले. अवकाश शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी यांनी नासा संस्थेचे कार्य, अवकाश स्थानकाचे कार्य आणि अंतराळातील बहल टेलीस्कोपची माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे यांनी बुवाबाजी, भोंदूगिरीची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील विज्ञान समजावून दिले. महोत्सवाच्या यशस्विततेसाठी दीपक नेरकर, स्वप्निल राजगुरू, श्रेणिक मानकर, विनीत जगताप, नीलकंठ शिर्के आदींनी प्रयत्न केले.