कोपरगाव तालुक्याचा पाणीप्रश्न हा दिवंगत नेते शंकरराव काळे यांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या निधनाने या संघर्षांतील अग्रणी हरपल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.
तालुक्याला गोदावरीचे हक्काचे अकरा टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यासाठी न्यायालयीन लढाई केली, चाळीस वर्षे संघर्ष केला. पाणी परिषदा, वृत्तपत्रातून लेखन व ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाला वाचा फोडली. कोसाकाच्या मदतीने त्यांनी दगडी साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गावतळी, पाझर तलावाची निर्मिती, ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांच्याच प्रयत्नातून अनेक गावांत दत्त, हनुमान व काशीविश्वेश्वर मंदिरे उभी राहिली.
शंकरराव काळे यांचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बी.एस्सी व बी. ई. (सिव्हील) पर्यंत शिक्षण घेतले. त्या काळात माजी मंत्री बी. जे. खताळ, दत्ता देशमुख, बी. जी .शिर्के, पी. जी. साळुंके यांच्यासारखे मित्र त्यांना लाभले. जिल्हा परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांनी १९६२ ते १९७२ या कालावधीत जि.प.चे अध्यक्षपद भूषवले. १९७२-१९८० या काळात ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचा सहकार व राजकारणातील आलेख चढताच राहिला. सन ९० मध्ये कोपरगाव मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले.
अल्पकाळ नोकरी केल्यानंतर विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब भारदे व स्वामी सहजानंद भारती यांच्या आग्रहास्तव त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी मिळाली. १९५२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढवली होती, त्यात ते पराभूत झाले. याच काळात नगर जिल्ह्य़ात पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर काळे यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखाना स्थापन केला. शेवटपर्यंत त्यांनी या कारखान्याची धुरा सांभाळली. पारनेरचे आमदार म्हणून त्यांनी बराच काळ जिल्ह्य़ाच्या राजकारणावर ठसा उमटवला. १९६२ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ात काँग्रेसने बारा पैकी दहा, तर जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३४ जागा जिंकून बाजी मारली होती. याच काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्ह्य़ात गावपातळीवर माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयाची मोठय़ा प्रमाणावर उभारणी झाली. रयतच्या कार्यात शंकरराव काळे सहभागी झाले, नंतर बराच काळ अध्यक्ष या नात्याने त्यांनी संस्थेची धुरा वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2012 रोजी प्रकाशित
पाण्याच्या संघर्षांतील अग्रणी हरपला
कोपरगाव तालुक्याचा पाणीप्रश्न हा दिवंगत नेते शंकरराव काळे यांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या निधनाने या संघर्षांतील अग्रणी हरपल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. तालुक्याला गोदावरीचे हक्काचे अकरा टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.

First published on: 07-11-2012 at 03:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sad demise of leader shankar kale who fight for water