लातूर जिल्हय़ातील विकास सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारने सहकारभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. सहकारक्षेत्र व साखर उद्योगात उत्कृष्ट कार्य करणारी सहकारी संस्था म्हणून या पुरस्कारासाठी निवड केल्याची घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने करण्यात आली.
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य सरकारतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा सहकारभूषण पुरस्कार विकास साखर कारखान्यास राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम आदींच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १६) नागपूरच्या विभागीय क्रीडासंकुल येथे प्रदान करण्यात येणार आहे. सहकारी साखर कारखान्यांमधून एकमेव ‘विकास’ची या पुरस्कारासाठी निवड झाली.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांमार्फत राज्यातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांचा अभ्यास करून सहकार चळवळीची तत्त्वे, ध्येयधोरणाप्रमाणे उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहकारी संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. विकास सहकारी साखर कारखान्याची वाटचाल राज्यासह देशपातळीवर अग्रगण्य ठरल्याचे पुरस्कार देताना नमूद केले आहे.
आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याने चाचणी हंगामापासून नियोजनपूर्वक वाटचाल केली. आíथक शिस्त, काटकसरीने कारभार यामुळे कारखाना नफ्यात आहे. पुरस्कारासाठी निवड करताना आíथक व्यवस्थापन, नियोजन, प्रशासकीय कामकाज, संगणकीकरण, ऊस विकास योजना, मनुष्यबळ विकास उपक्रम, ऊसउत्पादकांना सुविधा, पाणीव्यवस्थापन, पर्यावरणसंवर्धन, तांत्रिक कार्यक्षमता, ऊसशेती यांत्रिकीकरण आदी बाबींची सहकार खात्याकडून दखल घेण्यात आली.