‘गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथाला शीख पंथीयांमध्ये आदराचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. या ग्रंथात संत नामदेवांच्या ६२ अभंगांचा समावेश आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘गुरुग्रंथसाहिब’मधील नामदेवांच्या काही निवडक अभंगांना आता स्वरांचे कोंदण लाभले आहे. ‘नामदेव बानी’असे या ध्वनिफीतीचे नाव असून हे अभंग पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर यांनी गायले आहेत तर जीवन धर्माधिकारी यांनी संगीत दिले आहे. ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या ‘सरहद म्युझिक’ने या ध्वनिफितीची निर्मिती केली असून घुमान साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह करणारे ख्वाजा सय्यद यांनी या ध्वनिफितीचे मुखपृष्ठ केले आहे.
ध्वनिफीतीमधील मूळ अभंग पंजाबी भाषेतील असल्याने आपण पंजाबी भाषेचा अभ्यास केला. चाली शास्त्रीय संगीतामध्ये बांधतानाच भाषा, स्वर आणि त्यातील पंजाबी बाज जपण्याचे मोठे आव्हान आणि जबाबदारी होती. संगीतातून पंजाबी लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती संगीतकार जीवन अभ्यंकर यांनी दिली.  १० नोव्हेंबर रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते ध्वनिफीतीचे प्रकाशन होणार आहे.
ध्वनिफीतीमध्ये एकूण आठ रचना असून त्या पं. अभिषेकी, पं. अभ्यंकर यांच्यासह प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, मनिषा वाडेकर यांनी गायल्या आहेत. ध्वनिफितीमध्ये ‘जय गुरुदेव जय गुरुदेव’, ‘मोको तू ना बिसर’, ‘बेदपुराण शास्त्र अनंत’, ‘रे जीव्हा’, ‘राम नाम बिना और ना दुजा’ आणि अन्य काही असे आठ अभंग आहेत.
ध्वनिफीतीच्या निर्मितीमध्ये शुभंकर शेंबेकर, डॉ. रामचंद्र देखणे यांचाही मोलाचा सहभाग असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले. राज्यभरातील दोन हजार मान्यवरांना ही ध्वनिफीत भेट म्हणून देण्याचे नहार यांनी ठरविले आहे.