संत संताजी जगनाडे यांचे बरेच साहित्य मोडी लिपीत असून ते मराठीत आणण्याचे काम फुला बागूल यांनी करावे, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.
येथील साक्षात प्रकाशनतर्फे ‘संताजी जगनाडे : चरित्र आणि अभंगांची चर्चा’ या ग्रंथाचे प्रकाशन जीवन विकास ग्रंथालयात डॉ. बडवे यांच्या हस्ते झाले. ग्रंथाचे लेखक फुला बागूल, लेखक बाबा भांड, प्रकाशक रमेश राऊत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बाबुराव महाराज सोनवणे बहिरगावकर होते.
डॉ. बडवे म्हणाले की, संताजी जगनाडे यांनी घाण्यावरील अभंगांत अध्यात्माचे रूपक मांडले आहे. मनुष्याचे देह म्हणजे घाणा असे रूपक मांडून त्यांनी अभंगरचना केली. मानवी देह हा घाणा असेल तर त्यातून निघणारे तेल हे चैतन्य आणि सुविचारांचे तेल आहे, अशी मांडणी त्यांनी आपल्या अभंगांतून केली. फुला बागूल म्हणाले की, संत संताजी जगनाडे यांच्यामुळेच संत तुकारामांच्या गाथा आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्यांचे हे मराठी भाषेवर ऋण आहे. पण असे असले तरी त्यांनी लिहिलेल्या अभंग आणि अन्य साहित्याकडे अजूनही लक्ष गेले नाही. या प्रसंगी राऊत, खंडाळकर, बाबा भांड आदींची भाषणे झाली.