विदर्भातील सारथी या संस्थेतर्फे उद्योग, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला सारथी मानपत्र पुरस्कार देण्यात येतो. उद्योजक चंद्रशेखर देशपांडे, विजय काशीकर, कवी सागर खादीवाला, शंकर बळवंत पंडित, नाटय़ आणि मालिका कलावंत नरेश बिडकर आणि युवा खेळाडू दिव्या देशमुख यांना जाहीर करण्यात आले आहे. तर विशेष योगदान म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा आपटे यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सारथी संस्थेचे प्रमुख अमर आणि अनिरुद्ध वझलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भामध्ये विविध क्षेत्रात गुणवंतांची खाण असून अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर विदर्भाचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा गुणवंतांचा गेल्या १९ वर्षांंपासून सारथी मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करीत असते. सत्काराचे २०वे वर्ष आहे. यशस्वी व्यक्तींना अजून यशाची शिखर पादाक्रांत करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि ज्यांनी देशभर किंवा जगामध्ये नाव कमविले आहे त्यांचा आदर्श लोकांसमोर प्रस्थापित होऊन सामान्यांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने सारथी हा उपक्रम सुरू केला आहे. सारथी समितीने कोणत्याही प्रकारचे अर्ज न मागवता सत्कारमूर्तीची निवड केली आहे. गेल्यावर्षी पासून सारथीने सारथी परिवारातील व्यक्तींना देखील सन्मानित करण्याचे ठरविले आहे. यात सारथीशी अनेक दिवसांपासून जुळलेल्या गुणवंत व्यक्तीचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी डॉ. प्रज्ञा आपटे यांची निवड करण्यात आली आहे.  उदयोन्मुख किंवा आशादायक आणि नैपुण्य प्राप्त प्रस्तापित झालेल्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. उद्योग, वाणिज्य, क्रीडा आणि कला व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले जातात, असेही वझलवार यांनी सांगितले. १४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता कुसुमताई वानखेडे सभागृहात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  पुरस्कार प्राप्त डॉ. चंद्रशेखर देशपांडे बहुआयामी व्यक्तीमत्त्व आहे. अमेरिकेतील फॉर्चून ५०० कंपनीमध्ये अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या डॉ. देशपांडे आर.एफ अ‍ॅरेसिस्टिम प्रा. लि.चे अध्यक्ष आहेत. उद्योजक विजय काशीकर अंकूर सीड्स कंपनीचे संचालक आणि गॅलेक्सी गोविंद इन्फ्रामार्ट कंपनीचे अध्यक्ष आहेत.
मूळचे नागपूरकर असलेले ९० वर्षीय शंकर बळवंत पंडित सध्या अमेरिकेतील न्यूयार्कमध्ये वास्तव्यास आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. ‘कधी कधी’, आणि निंबोळीच्या सरी’ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. नागपूरकर असलेल्या नरेश बिडकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतचा ठसा निर्माण केला आहे. अनेक राज्य नाटय़ स्पर्धेत त्याला पारितोषिके मिळाली आहेत.  गेल्या ९ वर्षांपासून मुंबईत स्थानिक झाल्यानंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत. डॉ. सागर खादीवाला व्यगंचित्रकार, गझलकार आणि उत्तम समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमातून रसिकांसमोर त्यांनी कविता सादर केल्या आहेत.