सत्यशोधक ओबीसी परिषदेच्यावतीने येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी दुसरे सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन सोलापूरच्या  शिवछत्रपती रंगभवनात भरणार आहे. संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद यादव हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार आहेत.
या संमेलनस्थळाला ‘क्रांतिबा ज्योतिबा फुले नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. सहा परिसंवाद व एक कविसंमेलन व दोन एकांकिकांचे सादरीकरण याप्रमाणे या संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरली आहे. ‘ओबीसीला पर्याय धर्मातर’ या सध्या चर्चेत असलेल्या मुद्यासह विविध ज्वलंत विषयांवर चर्चा होणार आहे.  संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास ओबीसी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंतराव उपरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबतची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मनसेचे शहरप्रमुख युवराज चुंबळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. ९ रोजी सकाळी ८.३० वाजता संविधान दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. उद्घाटन सोहळयाप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नातसून नीता होले यांच्या हस्ते ‘सत्यशोधन’ स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, उद्योग आदी क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘सत्यशोधक गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे चुंबळकर यांनी नमूद केले.
उद्घाटन सत्रानंतर ‘हिंदू ओबीसींचा मूळ धर्म, पंथ व गुरू कोणता? परिवर्तन आणि विपर्यास्त’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच हनुमंतराव उपरे यांची ‘ओबीसीला पर्याय धर्मातर’ या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात ‘ओबीसी संत, सुफी संप्रदाय साहित्यातील मानवतावाद व विद्रोह’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. संभाजी पालवे यांची ‘मी गाडगेबाबा बोलतोय’ ही एकांकिका व सत्यशोधकी जलसा झाल्यानंतर रात्री निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे.
दि. १० रोजी होणाऱ्या परिसंवादांमध्ये ‘ओबीसींची जनगणना न करणे: सत्तेची भीती की राजकीय षडयंत्र?’, ‘हिंदू महिलांचे कर्मकांड: शोकांतिका की प्रगतीतील अडसर?’, जागतिकीकरण: बलुतेदार व अलुतेदारांच्या कुशलतेवर, साधनांवर व आर्थिकतेवर झालेल्या परिणामांवरील उपाय’, ‘शिष्यवृत्ती: पदोन्नती, शैक्षणिक सवलत की संधी?’ या विषयांवर चर्चा घडणार आहे. या संमेलनाचा समारोप कर्नाटक राज्य मागासवर्ग महासंघाचे उपाध्यक्ष जी. के. सत्या यांच्या उपस्थितीत होणार असून या प्रसंगी ‘ओबीसी मित्र पुरस्कार’ वितरण होऊन ठरावही मंजूर होणार आहेत. या संमेलनासाठी राज्यभरातून सुमारे एक हजार प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित असल्याचे चुंबळकर यांनी सांगितले.