महानगरपालिकेच्या माध्यमातून सफाई कामगारांची रिक्त पदे न भरता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी काढण्यात आलेली ई निविदा त्वरीत रद्द न केल्यास सिंहस्थात बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आला आहे.
राज्यातील भाजप सरकार मनपा आस्थापना परिशिष्टावरील सफाई कामगारांच्या रिक्त पदांना मंजुरी न देता ही कामे ठेकेदार व कंत्राटदारांकरवी करण्याचा घाट घालत आहे. आयुक्त याविरुद्ध शासनाशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार न करता एक प्रकारे ठेकेदारांच्या पाठीशी उभे राहत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. संडास, मलमूत्र साफसफाईची कामे ठेकेदारांना देण्यासाठी निविदा काढून बाल्मिकी, मेघवाळ, मेहतर, नवबौद्ध समाजावर अन्याय करण्यात येत असल्याचेही समितीने निवेदनात म्हटले आहे.
अशा प्रकारे निविदा काढून ठेकेदारामार्फत कामे करण्याचा प्रयत्न होत असून ही निविदा प्रक्रिया राबविली गेल्यास भविष्यात हा वर्ग मोठय़ा प्रमाणावर बेरोजगार होऊन त्यांचा व्यवसाय हिरावला जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना न्याय न दिल्यास सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रत्येक रस्त्यांवर, शाही मार्गावर घाण टाकून निषेध व्यक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सुधारित आकृती बंधानुसार मनपा प्रशासनाने ३० मार्च २०१३ रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रानुसार सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात परवानगी घेऊन सदर पदे कुंभमेळ्याआधी भरण्यात याव्यात, अशी मागणी समितीचे अध्यक्ष सुरेश दलोड, कार्याध्यक्ष सुरेश मारू यांनी केली आहे.