टोलनाक्यातून शालेय बसवाहतुकीला सवलत मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यात आपली वाहने थांबवून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याने या बसचालकांविरुद्ध पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. सरकारने टोलनाक्यातून सवलत असणाऱ्या वाहनांच्या अध्यादेशात शालेय बसचा उल्लेख नसल्याने खारघर टोलनाक्यावर पुन्हा एकदा शालेय बसमालक व टोल वसूल करणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांचा संघर्ष गुरुवारी पाहायला मिळाला. शालेय बसकडून बुधवारपासून टोलवसुली पुन्हा सुरू झाल्यामुळे शालेय बसमालकांनी या अन्यायकारक टोलधाडीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी आंदोलन होणार अशी कुणकुण लागल्याने पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून खारघर व कामोठे टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शालेय बसमालकांचे प्रतिनिधी संतोष शेट्टी यांनी टोलनाक्यावर अनोखे आंदोलन घडविले. विद्यार्थ्यांना शाळेत सोडून आल्यानंतर खारघर येथे टोलनाक्यावर बसचालकांकडून टोलचे ११० रुपये मागण्यात आले. परंतु ते न देण्याची भूमिका बसचालक-मालकांनी घेतल्याने टोल कंपन्यांचे अधिकारी आणि बसचालक-मालक यांच्यात वादावादी झाली. शालेय बसचालकांनी टोल न देण्याची भूमिका घेत चार मार्गिकांवर चार शालेय बस थांबवून इतर वाहनचालकांना वेठीस धरण्याचा प्रकार केला. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली. अक्षरश: लहान वाहनांना जाण्यासाठीच्या ज्या चार मार्गिका आहेत तेथेही शालेय बस थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या आंदोलनाबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांचा ताफा टोलनाक्याजवळ तैनात असल्याने पोलिसांनी शालेय बसचालक, वाहकांकडून ही वाहने टोलनाक्यातून बाहेर काढून घेतली. त्यानंतर शालेय बसमालकांचे प्रतिनिधी संतोष शेट्टी व इतर १४ जणांवर रस्त्यामध्ये अडथळा केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.
अध्यादेशात शालेय बसच्या सवलतीचा समावेश केला असता तर हा प्रकार घडला नसता. आम्ही शालेय बस वाहतूक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देण्यासाठी निवेदन देणार आहोत. या विनासवलतीचा फटका आमच्यासह सामान्य पालकांना बसणार आहे. गुरुवारी विद्यार्थ्यांना घरी सोडून बस खारघर येथे परतत असताना टोलवसुली करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शालेय बस थांबवून पथकर मागितला. आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची व्हिडीओ क्लिप दाखविली. मात्र त्यांनी ते मान्य केले नाही. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आम्ही आमची वाहने काढून बाजूला घेतली. संतोष शेट्टी (शालेय बसमालक)
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2015 रोजी प्रकाशित
टोलनाक्यातून सवलतीसाठी शालेय बसचालकोंचे आंदोलन
टोलनाक्यातून शालेय बसवाहतुकीला सवलत मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यात आपली वाहने थांबवून अनोखे आंदोलन केले.

First published on: 12-06-2015 at 02:17 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scool bus owners agitates againts toll tax