पूर्व मुक्त मार्गावरील आणिक येथील प्रस्तावित दोनपैकी एकच बोगदा वाहतुकीसाठी खुला झालेला असल्याने वाहनधारकांची होत असणारी अडचण आता लवकरच दूर होणार आहे. हा ५८० मीटर लांबीचा दुसरा बोगदा येत्या १५ दिवसांत प्रवाशांसाठी खुला होत असून त्यानंतर पूर्व मुक्त मार्गाचा पहिला टप्पा पूर्णपणे प्रवाशांसाठी उपलब्ध होईल व त्यामुळे चेंबूरकडून येणाऱ्या वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर होईल.
दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला साडेसोळा किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचा साडे तेरा किलोमीटरचा लांबीचा टप्पा जून २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला झाला. ऑरेंज गेट ते आणिक हा ९.२९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, आणिक ते पांजरापोळ हा ४.३ किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा आणि पांजरापोळ ते घाटकोपर हा २.८१ किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा अशा रितीने हा प्रकल्प होत आहे.
मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने (इलेव्हेटेड रोड) प्रवास केल्यानंतर आणिक ते पांजरापोळ दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगरात ५०० मीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. पैकी जूनमध्ये एकच बोगदा खुला झाला. दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम झाल्यानंतर तेथे सांडपाणी वाहिन्या, विद्युतीकरण आणि रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. अर्थात यंदा पावसाळय़ाचा जोर थोडा जास्त असल्याने ऑक्टोबरपासूनच खऱ्या अर्थाने काम सुरू झाले. आता ही कामे संपत आली आहेत.
मुंबईतील अन्य पायाभूत प्रकल्पांबाबत दिलेल्या आश्वासनांप्रमाणेच हा बोगदासुद्धा डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन हवेत विरले होते. पण आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठ-पंधरा दिवसांत हा बोगदा वाहनधारकांसाठी खुला होईल, असे ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.