नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाचे ‘हजरतबाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन’ असे नामकरण करण्याबाबतचा वाद महापालिकेत सुरू असून नामकरणासंदर्भात काढलेल्या जाहिरातीची चौकशी होणार असल्याने येथील वातावरण ढवळून निघाले आहे. नामकरणासंदर्भात काढलेली जाहिरात चूक असल्याची कबुली महापालिकेने दिली आहे.
नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला हजरतबाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दिन यांचे नाव देण्याबाबत महापालिकेचे विकास अभियंता यांनी २४ मे रोजी वृत्तपत्रातून जाहिरात प्रकाशित करून आक्षेप व सूचना मागवल्या होत्या. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आक्षेप व सूचना प्राप्त न झाल्यास नामकरणाची कारवाई करण्यात येईल, असे या जाहिरातीत स्पष्ट केले होते. या जाहिरातीमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आणि हजरतबाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दिन असे नामकरण करण्यास लोकांनी आक्षेप घेतला. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेला आपली चूक लक्षात आली. कारण रेल्वेस्थानक केंद्र सरकारच्या अधीनस्त असल्यामुळे नामकरण करण्याचा अधिकार महापालिकेला नाही, मात्र महापालिका ठराव घेऊन तसा प्रस्ताव  केंद्र सरकारकडे पाठवू शकते, असे महापालिकेतील सूत्राचे म्हणणे आहे.
ही जाहिरात प्रसिद्ध करताना महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विचारण्यात आले नसून परस्पर ही जाहिरात  प्रकाशित करण्यात आली. या जाहिरातीमुळे रेल्वे प्रशासनही नाराज आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यास चांगलेच खडसावले असून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीची चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. रेल्वेस्थानकाला गोंडराजे बख्त बुलंदशहा यांचे नाव देण्याची मागणी जुनीच असून काही लोकांनी स्वामी विवेकानंद, तर काहींनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची सूचना केली आहे.