स्वतंत्र विदर्भासाठी कटिबद्ध राहून ठराव आणण्याचा प्रयत्न करू, वेळ पडल्यास राजीनामा देऊ, असे जाहीर करणाऱ्या उमेदवाराला अथवा पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय संयुक्त विदर्भ कृती समितीच्या सुकाणू समितीने घेतल्याची माहिती कृती समितीचे संयोजक माजी आमदार वामनराव चटप आणि आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या लोकसभा निवडणुकीत कृती समिती प्रत्यक्ष उतरणार नसली तरी प्रत्येक लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालयी ‘बोला उमेदवार बोला’ या विषयावर जाहीर सभा घेणार आहे. या सभेत जो उमेदवार विदर्भासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन देईल, त्यालाच मतदान करण्याची विनंती मतदारांना केली जाईल. नुकतेच विदर्भात ठिकठिकाणी विदर्भाच्या बाजूने मतदान घेण्यात आले. त्यात विदर्भातील जनता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने दिसून आले. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जो पक्ष किंवा उमेदवार स्वतंत्र विदर्भाच्या विरोधी आहे, त्यांनाही तुम्हाला विदर्भ का नको आहे, असा प्रश्न विचारून त्याचे मत जाणून घेतले जाणार आहे. स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही चटप आणि बोंडे यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी आम्ही विदर्भातील संपूर्ण खासदारांकडे गेलो. त्यांना निवेदन दिले. परंतु यापैकी एकाही खासदाराने स्वतंत्र विदर्भाबाबत संसदेत आवाज उठवला नाही. त्यामुळे आता काँग्रेससह भाजपवरही विश्वास राहिला नाही. तरीही येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आम्ही आमची मागणी ठेवणार आहे. ही मागणी पूर्ण करणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, राम नेवले, दीपक निलावार, विक्रम गोखे प्रामुख्याने उपस्थित होते.