राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकाच व्यासपीठावर येत आहेत. ‘आदर्श’ घोटाळ्याचा अहवाल फेटाळण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जुंपली असताना दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने त्याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. शतक महोत्सवी वर्षांचे उद्घाटन शनिवारी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
मविप्र शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षांतील उपक्रमांची माहिती सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली. गंगापूर रस्त्यावरील संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व मंत्री या निमित्त एकत्र येत आहे. सध्या या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चांगलेच वाक् युध्द रंगले आहे. आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची सूचना राहुल गांधी यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगून त्यांना लक्ष्य केले. सिंचन घोटाळ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना याच पध्दतीने अडचणीत आणले होते. त्याची कसर भरून काढण्याची संधी राष्ट्रवादी साधत असून उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रवक्ते मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसवर शरसंधान साधत आहे. या घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर, एकत्र येणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडे उभय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, शतक महोत्सवी वर्षांनिमित्त मविप्र शिक्षण संस्थेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावे म्हणून संस्थेने ‘मूल्य व जीवनशिक्षण’ या विषयावर खास अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. असा अभिनव उपक्रम राबविणारी मविप्र ही एकमेव संस्था असल्याचे पवार यांनी नमूद केले.
संस्थेतील विविध उपक्रमांची माहिती सभासद व संस्थेच्या ३५९ शाखांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजपत्रिका हे मासिक प्रसिध्द केले जाईल. त्याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
स्वच्छता अभियान, सभासद व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, अक्षर सुधार मोहीम, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी ‘ओएमआर’ पध्दतीचा अवलंब, मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत अखिल भारतीय मविप्र वक्तृत्व स्पर्धा, मविप्र सांस्कृतिक महोत्सव,  एक समान गणवेश व एक समान प्रार्थना, राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धा, संस्थेच्या ऐतिहासिक घटनांचे चित्रप्रदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्वयंपूर्णता, संस्थेचा इतिहास लेखन, फोटो बायोग्राफी, इंग्रजी सुधार मोहीम, शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी टीजीई परीक्षा, मविप्र व्यावसायिक केंद्र, नाशिकमधील पहिलेच जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, महाविद्यालयांच्या अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था, मविप्र वसुंधरा अभियान आदी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती पवार यांनी दिली. या शिवाय, १५ एप्रिल १९२० रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या उदोजी मराठा वसतीगृहाच्या इमारतीचे ‘हेरिटेज’ वास्तू म्हणून जतन केले जाणार आहे. त्याचे काम सध्या सुरू असून पुढील सहा महिन्यात ते पूर्ण होईल, असेही पवार यांनी सांगितले.