डोंबिवलीजवळील काटई येथील टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आव्हानानंतर दोन वेळा फोडला. या टोलफोडीनंतर मनसेचे डोंबिवलीतील काही कार्यकर्त्यांना आधारवाडी तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगात गेलेल्या अशाच एका आक्रमक मनसे कार्यकर्त्यांच्या डोंबिवलीतील घरी येऊन शर्मिला ठाकरे यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
‘‘एकटय़ाने एवढा पुढाकार घेऊन आक्रमक आंदोलने करू नका. तुमच्यामागे असलेल्या कार्यकर्त्यांनाही पुढे येऊन आंदोलने करू दे. केवळ चॅनेलवर पुढे पुढे केले म्हणजे साहेबांना तुम्ही दिसता असे नाही. कोण किती काम करतेय हे मागे राहूनही साहेबांना दिसतेय. आता एवढय़ा पोलीस तक्रारी नावावर झाल्या आहेत. मग ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी तडीपारीची कारवाई झाली तर काय करायचे? त्यामुळे त्यांना आता समजावा. एवढा आग्रही आक्रमकपणा बरा नव्हे,’’ अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी मनसेचे शहर अध्यक्ष व परिवहन समिती सभापती राजेश कदम यांच्या कुटुंबीयांना समजावले. त्याचबरोबर कदम यांची विधानसभेसाठी उमेदवारीची जागा निश्चित असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले.
काटई टोलनाका दोनदा फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांना राजेश कदम हे पहिल्या क्रमांकाचे आरोपी आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यासह अन्य दोन जणांना जामीन देण्यास विरोध दर्शविला. कदम यांच्यासह दोन जण बारा दिवस आधारवाडी तुरुंगात राहिल्याने त्यांच्या कुटुंबीयांची शर्मिला ठाकरे यांनी डोंबिवलीत येऊन भेट घेतली. या वेळी मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. शर्मिला वहिनींच्या तोंडून विधानसभेबाबत झालेल्या उल्लेखावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना वहिनींच्या तोंडून हा सगळा ‘संदेश’ घडाघडा बाहेर पडल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. तसेच बुधवारी होणाऱ्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात राजेश कदम वगळता कोणता नवा चेहरा पुढाकार घेतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

केवळ चॅनल्सवर
चमकेशगिरी करू नका
एकटय़ाने एवढा पुढाकार घेऊन आक्रमक आंदोलने करू नका. तुमच्यामागे असलेल्या कार्यकर्त्यांनाही पुढे येऊन आंदोलने करू दे. केवळ चॅनेलवर पुढे पुढे केले म्हणजे साहेबांना तुम्ही दिसता असे नाही. कोण किती काम करतेय हे मागे राहूनही साहेबांना दिसतेय.
    ल्ल शर्मिला ठाकरे