दादर चौपाटी ते माहीम या पट्टय़ात समुद्राचे पाणी घुसल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये घमासान जुंपली आहे. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी मेरिटाइम बोर्डाच्या मदतीने सातत्याने प्रयत्न करून दादर चौपाटीच्या सुशोभिकरणाबरोबरच समुद्रात धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम योग्य वेळेत झाल्यास त्याचे श्रेय मनसेला मिळू शकते, हे लक्षात घेऊन मुंबईच्या किनाऱ्यालगत घुसलेल्या पाण्याचे निमित्त करत शिवसेनेने दादर-माहिममधील कामाचीच चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
दादर-माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा अत्यंत जिव्हाळ्याचा. दादरचा बालेकिल्ला गेल्या विधानसभा व पालिका निवडणुकीत मनसेने अलगद हस्तगत केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने कोणत्याही परिस्थितीत दादरचा किल्ला पुन्हा सर करण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांच्या विजयाने शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीत कदाचित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जरी या मतदारसंघातून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करण्यासाठी सेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
मनसेनेही आपल्या सात नगरसेवक व आमदारांच्या माध्यमातून हा गड राखण्यासाठी विविध लोकोपयोगी कामे हाती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दादर चौपाटीचे सुशोभिकरण, समुद्र किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारे बांधणे, हे काम दुसऱ्या टप्प्यात थेट माहीमपर्यंत नेण्याची योजना मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी आखली आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी समुद्रात बंधारे बांधले. महापौर निवासस्थानाच्या भिंतीलगत हे बंधारे टाकण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सरदेसाई यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून मेरीटाइम बोर्डाला कामाला गती देण्यास भाग पाडले.
सरदेसाई यांच्या म्हणण्यानुसार असे संरक्षक बंधारे माहीमपर्यंत बांधण्यात आले तर समुद्राचे पाणी दादर-माहीम किनाऱ्यालगतच्या घरात शिरणार नाही. मिठी नदीचे काम वेळेत न करणे, मिठीचा नाला वळवणे यामुळे भरतीच्यावेळी लाटा उसळून दादर-माहीम परिसरात यावेळी पाणी घुसले. १२ जूनला भरतीमुळे समुद्राच्या लाटा थेट इमारतींवर धडकू लागल्या. रस्ते व इमारती जलमय होऊन २६ जुलै २००५सारखी परिस्थिती ओढवण्याची भीती नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केली.
हे काम झाले तर त्याचे श्रेय मनसेला मिळू शकते. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक होत ‘सीआरझेड’चे उल्लंघन या कामात झाल्याचा आरोप केला आहे. महापौर सुनील प्रभू यांनी समुद्र किनाऱ्यावर भरती करून वॉक -वे आणि ट्रायपॉड टाकणाऱ्या मेरिटाइम बोर्डाला जबाबदार धरले आहे. ट्रायपॉड टाकल्यामुळे भरतीचे पाणी दादरमध्ये घुसले का, याच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणीच महापौरांनी केली आहे. ज्यांनी वॉक-वे बांधले तसेच समुद्रात भरणी केली ते तसेच मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी समुद्राचे पाणी दादर-माहीममध्ये शिरल्यानंतर तेथे फिरकलेही नाहीत, असा आक्षेपही महापौरांनी घेतला आहे.
या साऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी महापौरांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे तर दुसरीकडे माहीमपर्यंत समुद्रात ट्रायपॉड लवकरात लवकर टाकून दादर-माहीम पुन्हा समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून वाचावे म्हणून आमदार नितीन सरदेसाई यांनी निकराची लढाई सुरु केली आहे. या लढाईला उद्योगमंत्री नारायण राणे यांचीही साथ असून मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व ती मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले