अमरावती जिल्ह्य़ातील नांदगावपेठ येथील इंडिया बुल्स कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पातील पाच कामगारांना कामावरून काढून टाकल्याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेना आमदार अभिजीत अडसूळ आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी चांगलीच बाचाबाची झाली. कंपनीने या कामगारांना परत कामावर घेण्याचा निर्णय घेतला असला, तरी कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अभिजीत अडसूळ यांनी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.
इंडिया बूल्स कंपनीने चार कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवल्या जात नाहीत, असेही सांगण्यात येत होते. परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार अभिजीत अडसूळ, मोर्शीचे अपक्ष आमदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे, शिवसेनेचे महानगर प्रमुख दिगांबर डहाके, जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भय्या अरबट, महानगर प्रमुख अभिजीत वडनेरे, पराग गुडधे, सुनील राऊत, कामगार सेनेचे प्रकाश तेटू, नितीन तारेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते कंपनीच्या कार्यालयात पोहोचले.
अभिजीत अडसूळ, डॉ. अनिल बोंडे, साहेबराव तट्टे यांनी कंपनीचे संचालक डॉ. शरद किनकर यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान, डॉ. किनकर यांनी कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना परत घेतल्याचे सांगितले.
मात्र, कामगारांच्या सेवाविषयक सुविधा, परप्रांतीय कामगारांची संख्या याविषयी विस्तृत माहिती ते देऊ न शकल्याने अभिजीत अडसूळ संतापले. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही दूरध्वनीवरून बातचीत केली, पण त्यांचे समाधान होऊ शकले नाही. अडसूळ यांनी कामगारांना योग्य सुविधा पुरवण्याची मागणी केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
इंडिया बुल्सच्या कार्यालयात अडसूळांचा आक्रमक पवित्रा
अमरावती जिल्ह्य़ातील नांदगावपेठ येथील इंडिया बुल्स कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पातील पाच कामगारांना कामावरून काढून टाकल्याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेना आमदार अभिजीत
First published on: 19-02-2014 at 08:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mps protest in the india bulls office