शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील उत्तर भारतीय मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार यांसारख्या राज्यातील नेत्यांची फौज ठाण्यात उतरवल्याने भाजपच्या परप्रांतीय फॉम्र्युल्याला शह देण्यासाठी शिवसेनेने शाखाप्रमुख तसेच गटप्रमुख स्तरावरील कार्यकर्त्यांना अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. या मतदारसंघातील पंचरंगी लढतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघातील गुजराती, मारवाडी मतांच्या धुव्रीकरणासाठी भाजपने गुजरात, राजस्थान या राज्यांतील पदाधिकाऱ्यांना प्रचारात उतरवले आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील उत्तर भारतीय वस्त्यांसाठी उत्तर प्रदेशातील पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परप्रांतीय मतांच्या ध्रुवीकरणाचे हे प्रयत्न लक्षात घेऊन शिवसेनेने शाखाप्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मराठी भाषिकांच्या अस्मितेची भाषा करत शिवसेनेचे राजकारण सुरू असले तरी ठाण्यातील बहुतेक परप्रांतीय वस्त्यांवर आजही सेनेचा वरचष्मा दिसून येतो. शिवसेनेच्या या परंपरागत मतांना धक्का देण्यासाठी भाजपने प्रचाराची रणनीती आखली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. कोपरी-पाचपाखाडी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उत्तर भारतीय मतांवर डल्ला मारण्यासाठी उत्तर प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले असून ओवळा-माजीवडा मतदारसंघात संजय पांडे या अपक्ष नगरसेवकास उमेदवारी देण्यामागे भाजपची हीच खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. ओवळा-माजीवडा मतदारसंघात सुमारे एक लाखाहून अधिक उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे एरवी भाजपशी काहीही देणेघेणे नसलेल्या पांडे यांना िरगणात उतरवून पक्षाने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. ठाणे शहरात गुजराती-मारवाडी तसेच उत्तर भारतीय वस्त्यांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून नौपाडा, पाचपाखाडी येथील ब्राह्मणबहुल मते तर या पक्षाने गृहीत धरल्यासारखी स्थिती आहे.
भाजपची ही रणनीती लक्षात घेऊन शिवसेनेने सोमवारी रात्री तातडीची बैठक बोलावून शाखाप्रमुखांना सक्रिय होण्याचे आदेश दिले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अस्मितेचा मानला जातो. या मतदारसंघातील पंचरंगी लढतीमुळे येथील चुरस वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नारायण पवार आणि राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे हे दोन उमेदवारही ताकदीने प्रचारात उतरल्याने शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, असे आदेश या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ िशदे यांनी दिले. उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेले नरेश म्हस्के तसेच इतर पदाधिकाऱ्यांनाही सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले असून या बैठकीसाठी पक्षाच्या माजी नगरसेवकांनाही बोलावून घेण्यात आले होते. ठाणे शहरातील मानपाडा, ढोकाळी, साकेत अशा भागांतील उत्तर भारतीय वस्त्यांमधील मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी भाजपने परराज्यातील नेत्यांच्या या भागात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या आयात नेत्यांना रोखण्यासाठी अधिक आक्रमक व्हा, असे आदेश शाखाप्रमुखांना देण्यात आले आहेत. गुजराथी, मारवाडी मतदारांपर्यंत पोहोचून शिवसेनेने इतकी वर्षे दिलेली साथ विसरू नका, असे भावनिक आवाहनही केले जाणार आहे. यासाठी नगरसेवकांनी तसेच शाखाप्रमुखांना खास सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.