देशात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्य़ात कुणी वालीच उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले असून ठाणे शहरात या पक्षाचा प्रवास निर्नायकी अवस्थेतून सुरू असतानाच कल्याणातही या पक्षाच्या नगरसेवकांना सांभाळताना शिवसेनेच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.
ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत विष्णुनगर येथील भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्याने शिवसेनेला विजयाचे गणित जमविताना अक्षरश: घाम फुटला होता. त्यानंतर परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या अशोक जोशी यांनी ऐनवेळेस शिवसेनेला ठेंगा दाखविला. या घटना ताज्या असताना कल्याण महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेविका अर्चना कोठावदे अशाच पद्धतीने गायब झाल्याने शिवसेनेसाठी भाजपचे नगरसेवक म्हणजे अवघड जागेचे दुखणे ठरू लागले आहे. ठाणे महापालिकेतील महायुती आणि आघाडी अशा दोन्ही बाजूंचे संख्याबळ ६५-६५ असे आहे. ठाण्यात भाजपचे आठ नगरसेवक असून यापैकी कुणाचाही पायपोस कुणात नसल्यासारखे चित्र आहे. सव्वा दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीदरम्यान भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्याने युतीच्या गोटात खळबळ उडाली होती. लोखंडेबाई अचानक गायब झाल्यामुळे महापौर पद गमवावे लागते की काय, अशी शिवसेनेची अवस्था झाली होती. अखेर काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावत शिवसेनेने कसाबसा विजय मिळवला. यानंतरही लोखंडेबाई नेमक्या कुठे गेल्या होत्या, याविषयी त्यांना कुणीही जाब विचारला नाही.
भाजपच्या ठाणे शहर अध्यक्षपदी मिलिंद पाटणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील मतभेदांनी अक्षरश: टोक गाठले. परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे सदस्य अशोक जोशी यांनी विरोधात मतदान करत शिवसेनेला धक्का दिला. या पराभवामुळे मिलिंद पाटणकर यांना पद गमवावे लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुकेश मोकाशी यांना निवडून आणताना शिवसेनेला बरीच कसरत करावी लागली. मोकाशी यांच्या निवडीविरोधात भाजपमधील काही नगरसेवकांनी बंडाचे शीड उभारल्याने शिवसेना नेत्यांची पंचाईत झाली होती. लोकसभा निवडणुकीतही कल्याण आणि ठाणे अशा दोन्ही मतदारसंघांत भाजपच्या दोन गटांना सांभाळताना शिवसेना उमेदवार हैराण झाले होते.
कल्याणातही डोकेदुखी कायम
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप नगरसेविका अर्चना कोठावदे अचानक बेपत्ता झाल्याने शिवसेनेला सभापती पदासाठी संख्याबळाची जुळवाजुळव करताना बरीच मेहनत करावी लागल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. स्थायी समितीत कोठावदे या भाजपच्या एकमेव सदस्य आहेत. असे असताना सभापती पदाच्या निवडणुकीसाठी तीन दिवस शिल्लक असताना कोठावदे बेपत्ता झाल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले. डोंबिवलीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात कोठावदे यांनी उघड बंड पुकारले. खरे तर कोठावदे यांच्या विजयात चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आमदार चव्हाण यांच्याच प्रभागातून कोठावदे निवडून आल्या होत्या. असे असताना महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांनी बंडाची भाषा सुरू केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारडे जड दिसत होते.
अखेर शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीला हाताशी धरून महापालिकेतील तिजोरीवर ताबा मिळवला असला तरी भाजपतील निर्नायकीमुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र प्रतिकिया उमटू लागल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या ठाणे महापौर निवडणुकीची पाश्र्वभूमी लक्षात घेत शिवसेनेने आतापासूनच मनसेच्या ठाण्यातील सात नगरसेवकांना जवळ घेण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी भाजपमधील नाराजीचा फटका या निवडणुकीतही पक्षाला बसू शकतो, अशी भीती शिवसेना नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे व्यक्त केली आहे.