भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्याच्या निषेधार्थ, तसेच जायकवाडीसाठीचे सुरु असणारे आवर्तन त्वरित थांबवावे या मागणीसाठी खा. भाऊसाहेब वाक्चौरे यांच्या नेतृत्वाखाली आज भंडारदरा धरणस्थळावर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. घोषणा देत धरणाची चाके बंद करण्यासाठी निघालेल्या ३५ कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. लोकभावनेची कदर न करता शासनाने आपला मनमानीपणा सुरुच ठेवल्यास जनताच एक दिवस धरणांचा ताबा घेईल, असा इशारा खा. वाक्चौरे यांनी यावेळी दिला.
भंडारदरा धरणातून कालपासून जायकवाडीसाठी तीन टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशाप्रकारे पाणी सोडण्यास तालुक्यातील या विरोधी पक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध असून जायकवाडीसाठी पाणी सोडणे बंद न केल्यास आज खासदार वाक्चौरे यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा धरणावर जाऊन चाकबंद करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यामुळे भंडारदरा धरण परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. धरण तसेच स्पीलवे कडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी पाऊणे पाचच्या सुमारास आंदोलकांच्या गाडय़ांचा ताफा भंडारदऱ्यात दाखल झाला. स्पील वे जवळच्या रस्त्यावर यावेळी मोठय़ा संख्येने पोलिस उपस्थित होते. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या गाडय़ा सांडव्याच्या तोंडाशीच थांबवल्या. तेथून घोषणा देत शिवसैनिकांचा जत्था धरणाकडे निघाला. स्पीलवे जवळ पोलिसांनी आंदोलकांना अडवले. तेव्हा आंदोलकांनी तेथेच ठिय्या मांडला. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी जायकवाडीला पाणी सोडण्याच्या काँग्रेस आघाडी शासनाच्या निर्णयावर कडक शब्दांत टिका केली. उत्तर नगर जिल्ह्याची गरज पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडले असते तर त्यास आमचा विरोध नव्हता, मात्र कोणालाही विश्वासात न घेता पाणी सोडण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह असल्याचे खा. वाक्चौरे यांनी सांगितले.
जायकवाडीला दरवर्षी पाणी सोडण्याची प्रथाच निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास उत्तर नगर जिल्ह्यातील शेती आणि साखर उद्योग संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आजचे आंदोलन प्रतिकात्मक असून लोकशाही मार्गाने आम्ही जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत, मात्र या भावनांची शासनाने दखल न घेतल्यास जनता धरणांचा ताबा घेईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भाषणानंतर आंदोलक घोषणा देत चाकबंद करण्यासाठी निघाले. पोलिस त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलकांच्या घोषणा सुरुच होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांचेसह पक्षाचे अनेक प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.