महिला अत्याचारांच्या बाबतीत नगर जिल्हय़ाचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे सांगून ही गोष्ट जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव पी. बी. घुगे यांनी केले.
महानगरपालिका, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व न्यायाधार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या असंघटित क्षेत्रातील महिला कामगार व दारिद्रय़रेषेखालील महिलांच्या बचतगटांच्या मेळाव्यात घुगे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर सुवर्णा कोतकर होत्या. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा प्रकल्पाधिकारी चंद्रकांत खोसे, प्रा. नीलिमा बंडेलू, न्यायाधारच्या संस्थापिका अॅड. निर्मला चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळ निवारण प्रतिबंधक कायद्याची माहिती या महिलांना व्हावी यासाठी या मेळावा आयोजित करण्यात आला होता.
घुगे यांनी या वेळी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध आर्थिक व सामाजिक योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांना कायद्याची माहिती नाही, हेच त्यांच्यावरील अत्याचाराचे एक कारण आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी महिलांनी या कायद्याची माहिती करून घेतली पाहिजे.
कोतकर यांनी बचतगट चळवळीचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, ही चळवळ आता रुजली आहे. मात्र चळवळीसमोर अनेक अडचणीही आहेत. त्या दूर करण्यासाठी संघटित प्रयत्नाची गरज असून महिला बचतगट सक्षम करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बंडेलू यांनी न्यायाधार संस्थेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. वंदना गाडेकर यांचेही या वेळी भाषण झाले. विक्रम सरगर यांनी सूत्रसंचालन केले. चौधरी यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
महिला अत्याचारांमुळे जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का- न्यायाधीश घुगे
महिला अत्याचारांच्या बाबतीत नगर जिल्हय़ाचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे सांगून ही गोष्ट जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव पी. बी. घुगे यांनी केले.
First published on: 07-02-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shock to progressive of district due to womens torture judge ghuge