दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघातात निकामी झालेला उजवा पाय घेऊन महामार्गावर ड्रक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या विरोधात जनजागृती करणारा तरुण, हेल्मेट घातली नाही म्हणून मोटारसायकल अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे रस्त्यात लिफ्ट मागणारे भूत, मूकबधिर असणाऱ्या एका लाहानग्याला घरी सोडणाऱ्या त्याच्या तरुण मित्राचा झालेला अपघात आणि त्या लहान मुलाने नंतर हातवारे करुन हेत्मेट वापरण्याचा महामार्गावर दिलेला संदेश, दारु पिऊन गाडी चालवू नकोस असे मित्राला सांगणारी तरुणी, दारु प्यायल्याने गाडी न चालवता गाडीत झोपी गेलेला तरुण अशा दहा लघुपटांनी (शॉर्ट फिल्म) नवी मुंबईतील महाविद्यालयात रस्ते सुरक्षेतेची एक वेगळी चळवळ सुरु केल्याचे दिसून येते.
राज्यात दोन जानेवारीपासून रस्ते सुरक्षा पंधरावडा सुरु करण्यात आला होता. त्याची शुक्रवारी सांगता झाली.  नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील यांनी संपूर्ण महामुंबईत जनजागृतीचे १७ विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. शुक्रवारी सीबीडी येथील राजीव गांधी मैदानात झालेल्या सांगता सभारंभात पाटील यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यासह चित्रपट अभिनेता सचिन पिळगावकर, संगीतकार, गायक शंकर महादेवन, त्यांचा मुलगा गायक सिध्दार्थ महादेवन उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी एज्येकशन हब असणाऱ्या नवी मुंबईतील महाविद्यालयातून रस्ते सुरक्षा या विषयावर पहिल्यांदाच लघुपट  स्पर्धा आयोजित केली होती.  विविध महाविद्यालयातील ५० विद्यार्थी गटांनी या स्पर्धेत भाग घेतला.
आपली कल्पकता वापरुन रस्ते सुरक्षा कशी सांभाळता येईल याचे प्रबोधन करणाऱ्या दहा फिल्म परिक्षकांच्या पसंतील उतरल्या. त्यात आयसीएल कॉलेजच्या सागर आणि ग्रुपने केलेल्या बी सेफ या फिल्मला पहिले पारितोषिक देण्यात आले. दुसरे बक्षीस एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले तर तिसरे परितोषिक आयसीएलच्या रॉयडेन सायमन्स यांच्या मेसेंजर या रस्ते सुरक्षेवरील विषयाला प्राप्त झाले. लघुपटाची ही थिम पोलिस विभागातर्फे पहिल्यांदाच राज्यात राबविण्यात आली. त्याला महाविद्यालयीन तरुणांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. उद्यानात उदास चेहऱ्याने बसलेला एक मूकबधिर मूलगा कोणीही खेळायला घेत नसल्याने शांत आहे. एका तरुणाला या लहान मुलाचा चेहरा बघवत नाही. तो त्याच्याबरोबर खेळतो. त्यानंतर त्या लहान मुलाला गाडीवरुन घरी सोडतो देखील. त्या लहान मुलाला सोडून घरी जाणाऱ्या तरुणाचे काही अंतर पुढे गेल्यावर अपघात होतो. त्यात त्याचा मृत्यू होता. यावेळी त्याने हेल्मेट घातलेली नसते. उदास आणि दुखी झालेल्या मुलाला दुसऱ्या तरुणाकडून वाहतूकीचे नियम शिकवणारी पुस्तिकी मिळते. हा मूकबधिर मुलगा नंतर रस्तामधून हेलमेट न घालता मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणांना हेल्मेट घालण्याची हात जोडून विनंती करतो. या फिल्ममध्ये मूकबधिर मुलाने केलेली अ‍ॅक्टींग भावणारी आहे. यासारखी फिल्म हेल्मेटची महत्व पटवून देण्यासाठी बोलकी ठरतात.