‘आशिकी-२’मधून तरुणांच्या हृदयात हलकेच घर करणारी श्रद्धा आता खास करण जौहरसाठी आयटम साँगवर नाचणार आहे. भलतेसलते विचार करू नका, कारण एक तर करण ‘तसा’ नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धालाही काही आवडनिवड आहे. तर करण जौहरच्या आगामी ‘उंगली’ या चित्रपटातील एक आयटम साँग श्रद्धावर चित्रित होणार असून केवळ आणि केवळ करणसाठी तिने आयटम साँग करायला होकार दिला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात श्रद्धासोबत इम्रान हाश्मीनेही आपले नृत्यरंग उधळले आहेत.
श्रद्धा आणि करण यांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. करण जौहर निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटातही श्रद्धा भूमिका साकारत आहे. यात ती करिना कपूर आणि इम्रान खान यांच्यासह दिसणार आहे. ‘उंगली’ या चित्रपटात एका आयटम साँगसाठी तिला विचारण्यात आल्यानंतर तिने फारसे आढेवेढे घेतले नाहीत. मात्र या गाण्याचे चित्रीकरण अद्याप झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या चित्रपटात संजय दत्त, कंगना राणावत, रणदीप हुडा आणि नेहा धुपिया अशा कलाकारांची तगडी फौज असून येत्या वर्षांत तो प्रदर्शित होणार आहे.