लग्नसंस्था आणि त्याच्याशी संबंधित विषय, त्या अनुषंगाने लग्नसंस्थेवर भाष्य करण्याचा प्रयत्न अनेक दिग्दर्शकांनी चित्रपटांतून केला आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आजची तरुणाई त्याकडे कसे पाहते, एकाच जोडीदाराशी अख्खे आयुष्य घालविण्याविषयी तरुणाईचे काय मत आहे, हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरुणाईच्या मनातील गोंधळ दाखविताना दिग्दर्शक, लेखक हेच गोंधळात पडले आहेत की काय अशी मांडणी चित्रपट करतो. त्यामुळे ‘फ्लर्टिग’च्या पलीकडे चित्रपट जाऊ शकत नाही. भरपूर चुंबनदृश्ये घालून तरुण प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्याचा धंदेवाईक प्रयत्न मात्र दिसतो. लग्नसंस्थेविषयी, लग्नाचे बंधन घालून घेण्याविषयी भाष्य मात्र चित्रपट करीत नाही.
रघुराम हा जयपूर शहरातील एक टुरिस्ट गाइड आहे. गाइड म्हणून काम करतानाच वरकमाईसाठी छोटय़ा-मोठय़ा कपडय़ांच्या दुकानात अर्धवेळ सेल्समन म्हणूनही तो काम करतो. त्याला प्रेमात पडण्याचा मात्र अनुभव नाही. लग्नसोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणारे ताऊजी यांच्याबरोबर तो कधीकधी भाडय़ाचा ‘बाराती’ म्हणूनही काम करतो. त्याचे लग्न ठरते आणि ‘बारात’ घेऊन वधू पक्षाच्या घरी जाण्यासाठी निघाल्यावर वऱ्हाडामध्ये त्याला लग्न तयारीची कंत्राटी कामे करणारी गायत्री भेटते. बसमधून एकत्र प्रवास करताना तो तिच्या प्रेमात पडतो. लग्न करायचे की नाही हे ठरविले नाही अजून असे सांगतो. वधू पक्षाच्या घरी गेल्यावर लग्न लागण्याच्या क्षणी तिथून रघु पळून जातो. पुढे अर्थातच रघुची गायत्रीशी भेट होते आणि त्यांचे प्रेम जुळते. मग सुरू होते चुंबनदृश्यांची अखंड मालिका. ती पडदा भरून व्यापून राहते. बोहल्यावरून पलायन केलेल्या रघुशी गायत्रीचे लग्न होते की नाही, यावर चित्रपट फिरत राहतो. ज्या मुलीशी जुळलेले लग्न मोडून रघु पलायन करतो ती मुलगी पुन्हा भेटल्यावर तिच्याही प्रेमात रघु पडतो. ‘रन अवे ब्राइड’ या इंग्रजी चित्रपटामध्ये वधू लग्नातून पलायन करते असे दाखविले होते. या चित्रपटात आधी वर मग वधू असे दोघेही पलायन करताना दाखविले आहे.
जयपूरसारख्या ऐतिहासिक शहरात राहणारी तरुणाई असो की महानगरीय जीवनशैलीची तरुणाई असो, तरुणाईच्या मनात लग्नसंस्थेविषयी, एकाच जोडीदारासमवेत अख्खे आयुष्य एकत्र काढण्याविषयी आणि एकुणातच गोंधळाचे वातावरण आहे हे सिनेमा अधोरेखित करतो. परंतु हे अधोरेखित करताना शारीर आकर्षणाच्या पलीकडे जाणारे प्रेम दाखविण्याची गरज होती. ते न दाखविता फक्त चुंबनदृश्यांवर लेखक-दिग्दर्शकाने भर दिला आहे. त्याचबरोबर एकदा वर स्वत:च्याच लग्नातून पलायन करतो आणि नंतर प्रेमविवाह ठरल्यानंतर वधूसुद्धा पलायन करते, असे दाखविण्यातून काय सांगायचे ते स्पष्ट होत नाहीत.
शुद्ध देसी रोमान्स असे शीर्षक देताना दिग्दर्शक-लेखक आणि चित्रपटाशी संबंधित सर्वच कलावंत, तंत्रज्ञ यांनी आपल्याला वाट्टेल ते, वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तसेच करणारी आजची तरुण पिढी आहे, भारतात जणू काही लग्नातून पलायन करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या खूपच वाढली आहे. सरसकट देशातील सर्व तरुणाई लग्नातून पलायन करते अशी मांडणी केल्याचे दाखवून देशातील स्थितीचे असलेले आपले अल्पज्ञान सिनेमाच्या माध्यमातून प्रकट केले आहे. लग्न करावे की करू नये की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहावे किंवा फक्त प्रेमसंबंध ठेवावेत, हा तरुणाईच्या मनातला प्रश्न प्रत्येक तरुण किंवा तरुणी आपापल्या पद्धतीने सोडवतात. तरुण पिढीला काही समजत नाही, काय वाट्टेल तसे वागता असे म्हणणारी मागची पिढी जसा विचार करते, त्याचप्रमाणे दिग्दर्शकाने कथानकाची मांडणी करताना एकच एक दृष्टिकोन ठेवून चित्रपट केला आहे, असा प्रेक्षकांचा समज होतो.
फक्त चुंबनदृश्यांची पखरण पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येईल, अशी काहीशी धंदेवाईक अटकळ चित्रपटकर्त्यांनी बांधली आहे, असेही जाणवते. चित्रपट प्रेक्षकांना काही प्रमाणात आवडेल कारण तिन्ही प्रमुख कलावंतांचा अभिनय आणि त्याला ऋषी कपूरची मिळालेली चांगली साथ. परिणीती चोप्राने साकारलेली गायत्री, वाणी कपूरने साकारलेली तारा आणि सुशांत सिंग राजपूतने साकारलेला रघुराम समर्पक ठरावेत. तिघांनीही आपापल्या भूमिका चोख सादर केल्या आहेत. तरुणाईची गोंधळलेली अवस्थाही तिघांनी चांगल्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

यशराज फिल्म्स प्रस्तुत
शुद्ध देसी रोमान्स
निर्माता – आदित्य चोप्रा, दिग्दर्शक – मनीष शर्मा. लेखक – जयदीप साहनी
संगीत – सचिन-जिगर, कलावंत – सुशांत सिंग राजपूत, ऋषी कपूर, परिणीती चोप्रा, वाणी कपूर, तरुण व्यास, कुणाल कुमार व अन्य.