*  ऐरोली-वाशी-बेलापूर पट्टयात रहिवासी आक्रमक
* खारघर, कळंबोली पट्टयात अडीच चटईक्षेत्राचा प्रस्ताव
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच चटईक्षेत्र लागू करावे, या नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावास हरकत घेणाऱ्या सिडको प्रशासनाने खारघर, कामोठे, कळंबोली या आपल्या अखत्यारित येणाऱ्या उपनगरांमधील इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी मात्र अडीच चटईक्षेत्राचा नवा प्रस्ताव तयार करून सर्वानाच बुचकळ्यात टाकले आहे. ऐरोली-वाशी-बेलापूर या उपनगरांच्या त्रिकोणात येणाऱ्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी दोन चटईक्षेत्र निर्देशांक द्यावा, अशी सूचना सिडकोने मांडली आहे. असे असताना पनवेल, कामोठे, कळंबोलीतील धोकादायक इमारतींसाठी एक न्याय तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी दुसरा, अशी भूमिका मांडल्याने सिडकोतील राजकीय पदाधिकारी रहिवाशांच्या रोषास कारणीभूत ठरले आहेत.
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. वाशीतील जे. एन. टाईप, कोपरखैरणे येथील आकाशगंगा वसाहतींमधील खंगलेल्या इमारती सिडकोने बांधलेल्या निकृष्ट बांधकामाचा नमुना ठरल्या आहेत. या धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचा सविस्तर आराखडा मध्यंतरी नवी मुंबई महापालिकेने तयार केला. या नुसार या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. शहरात अडीच चटई निर्देशांक दिला गेल्यास पायाभूत सुविधांवर त्याचे कसे परिणाम होतील, याचा अभ्यास करणारा एक अहवालही महापालिकेने तयार केला आहे. या इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टसह एक अडीच चटई निर्देशांकाचा एक सविस्तर प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. हा प्रस्ताव पाठविण्यापूर्वी महापालिकेने सिडकोसह शहरातील वेगवेगळ्या नागरी संघटना, तज्ञ मंडळींकडून हरकती, सूचना मागविल्या. या हरकती, सूचना सादर करताना अडीच चटई निर्देशांकास हरकत घेत सिडकोने दोन चटई निर्देशांकाची भलामण केली. नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावास हरकत घेताना सिडकोने काही मुद्दे सविस्तरपणे अधोरेखीत केले. एकीकडे हे करीत असताना सिडकोने खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या आपल्या अखत्यारित येणाऱ्या उपनगरांसाठी मात्र अडीच चटई निर्देशांकांचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. ही उपनगरे तुलनेने नवी असल्याने तेथील इमारतींचा पुनर्विकास तसेच नवी बांधकामे करताना अडीच चटई निर्देशांक दिला जावा, असा सविस्तर प्रस्ताव सिडकोच्या संचालक मंडळापुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे नवी मुंबई महापालिका हद्दीत रहाणाऱ्या नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
खारघर, कळंबोलीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता अडीच चटई निर्देशांकाची भलामण करताना नवी मुंबई महापालिका हद्दीत महापालिकेच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे सिडकोचे धोरण तुघलकी आहे, असा आरोप खासदार संजीव नाईक यांनी सोमवारी लोकसत्ताशी बोलताना केला.  
नवी मुंबई पुनर्विकास धोरण आखताना सिडकोच्या या दुहेरी भूमीकेमुळे शासनाकडे दुहेरी धोरणांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांवर हा एकप्रकारे अन्याय केल्यासारखे होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
 दरम्यान, सिडकोने ऐरोली-वाशी-बेलापूर पट्टयातील धोकादायक इमारतींसाठी अडीच चटई निर्देशाकाचे धोरण मान्य करावे, या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी सिडको अध्यक्षांची भेट घेतली.