सिडकोने बांधलेल्या घरांची २५ वर्षांतच पुनर्बाधणी करावी लागते, याचा अर्थ सिडकोने केलेले हे बांधकाम किती ‘उत्तम’ होते, याचा प्रत्यय येतो, अशा उपरोधिक शब्दात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी सिडकोला कानपिचक्या दिल्याने सिडको शहरातील सर्व मोडकळीस आलेल्या इमारतींचे नवीन वर्षांत सर्वेक्षण करणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिली. या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम या घरांची दुरुस्ती हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या घरांमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
सिडकोने मागील ४२ वर्षांत एक लाख २३ हजार घरे बांधली आहेत. त्यासाठी शेकडो इमारती बांधण्यात आल्या असून यातील बहुतांशी इमारतींची स्थिती आज जर्जर झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. छताचे छप्पर कोसळणे, बांधकामाचे लोखंड दिसून येणे, त्यामुळे लहान मुलांना विजेचा धक्का बसणे, यासारखे प्रकार दररोज एखाद्या विभागात होत असतात. या घरांची पुनर्बाधणी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. विकासकांना ही पुनर्बाधणी करावयाची असल्यास वाढीव एफएसआयशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे सध्या वाढीव एफएसआय प्रश्नांवरून नवी मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. यात दोन आणि अडीच एफएसआय मिळावा, असे दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. एफएसआय मिळाल्यास खासगी विकासकांना तो न देता सिडकोने या इमारतींची पुनर्बाधणी करून द्यावी, असाही एक प्रवाह जोर धरू लागला आहे. त्यात केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी रविवारी खारघर येथे सिडकोला चांगल्याच शब्दांत सुनावले. सर्वसामान्याचे घर घेणे हे आयुष्याचे स्वप्न असते. ते तरी सिडकोने नीट पूर्ण करावे, असे त्यांनी सांगताना सिडकोने क्वालिटी आणि क्वानटिटीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला होता. त्याची दखल सिडकोने घेतली असून नवीन वर्षांत नवी मुंबईतील सर्व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार असून त्याच्या अहवालानंतर दुरुस्तीला सुरुवात केली जाणार आहे. वाढीव एफएसआयच्या प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत सिडको हे सर्वेक्षण आणि दुरुस्ती हाती घेणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले. नवीन वर्षांच्या पहिल्याच सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.