कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाला सध्या बेकायदा जीप आणि सहा आसनी टमटम रिक्षांचा विळखा पडला आहे. पुरेसे नियोजन नसल्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचा परिसर यापूर्वीच वाहतूक कोंडीचे आगार बनले आहे. असे असताना बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनधिकृत थांबे याठिकाणी उभे राहिल्याने ही कोंडी आणखी वाढली आहे. वाहतूक पोलीस या वाहनांवर अधूनमधून कारवाई करतात. मात्र, एखाद-दुसऱ्या मोहिमेनंतर ही कारवाई थंडावते. रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे आधीच या सगळ्या परिसरात नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
या बेकायदा वाहनांमुळे रेल्वे स्थानक भागात येणाऱ्या शहरी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, बस, कल्याण डोंबिवली परिसरातील बसेसचा स्थानक परिसरातील प्रवेश कठीण बनला आहे. महालक्ष्मी हॉटेलसमोरील भागात स्कायवॉकच्या प्रवेशद्वारावर मुरबाडकडे जाणाऱ्या चार ते पाच जीप बिनधास्तपणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उभ्या असतात. केडीएमटी बसेसच्या थांब्यावर या बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अतिक्रमण झालेले दिसते. नेवाळी, श्रीमलंग गड येथे जाण्यासाठी केडीएमटीची बससेवा आहे. या मार्गावर सहा आसनी टमटममार्फत प्रवासी वाहतूक केली जाते. टमटमची वाहतूक नेतिवली, पत्रीपुलापर्यंत होणे बंधनकारक आहे. विविध मार्गावरून येणाऱ्या या टमटम बाजारपेठ चौकात प्रवेश करताना वाहतूक पोलिसांमार्फत त्यांच्यावर कारवाईचा देखावा उभा केला जातो. प्रत्यक्षात काही वेळातच टमटम रिक्षांचा मार्ग मोकळा करून दिला जात असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुचाकीवर गंडांतर
वाहने उभी करण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जागा नाही. दिलीप कपोते हे एकमेव वाहनतळ नोकरदार मंडळींच्या वाहनांनी सकाळीच भरून जातो. बोरगावकर वाडीतील वाहनतळ महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे धूळ खात पडून आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेले नागरिक दुकानासमोर, मोकळ्या जागेत दुचाकी वाहने उभी करतात. वाहतूक पोलीस अशी वाहने टोइंग व्हॅनमधून उचलून नेतात. प्रत्येक दुचाकी चालकाकडून दोनशे रुपये दंडात्मक कारवाई म्हणून वसूल केली जाते. एकीकडे सामान्य नागरिकांना शिस्तीचा बडगा दाखविला जात असताना बेकायदा जीप आणि टमटम रिक्षांवर का कारवाई होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मध्यंतरी वाहतूक पोलिसांनी काही कठोर उपाय हाती घेतले होते. कोठेही वाहने उभ्या करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाईचे हत्यार उपसण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कल्याण स्थानक पुन्हा एकदा बेकायदा वाहतुकीचे आगार बनले असून वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.