साधारणत: दीड महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या येथील ‘सिल्व्हर ओक’च्या गंभीर प्रश्नावर अखेर नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांना उशिराने का होईना शहाणपण सुचले. तथापि, या प्रश्नावर शाळा व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारचा असा मुहूर्त शोधला की, त्या दिवशी सुपे यांना कोणीच भेटले नाही. या पाश्र्वभूमीवर, शाळेतून बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बुधवारी ते शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत.
सिल्व्हर ओक शाळेतील एकूण १४ विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने शुल्क न भरल्याच्या कारणावरून दाखले देऊन घरी पाठविले होते. संबंधितांचे पालक याच शाळेत सेवेत असून त्यांनी वेतनासह इतर मुद्यांवर विरोधात भूमिका घेतल्याची शिक्षा या विद्यार्थ्यांना दिली गेल्याचा आक्षेप घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना याप्रकारे वर्गातून बाहेर काढल्याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली. परंतु, त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना प्राचार्यांनी दालनातून हुसकावून लावले. काही दिवसांपूर्वी आ. नितीन भोसले यांनी विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना केली होती. या प्रश्नात शिक्षण उपसंचालक सुपे हे अनास्था दाखवत असल्याचा आक्षेप नोंदवत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे मंगळवारी ते सिल्व्हर ओक स्कूलमध्ये दाखल झाले. यावेळी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक, मंचचे सदस्य उपस्थित होते. परंतु, या दिवशी शाळेचे मुख्य पदाधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. परिणामी, या प्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. सुपे यांनी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी बुधवारचा दिवस मुक्रर केला आहे. बुधवारी शाळा व्यवस्थापनाशी भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन सुपे यांनी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचला दिले आहे.