जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची थकीत वीज देयकांची सुमारे ४७ लाख रुपयांची रक्कम विशेष बाब म्हणून टंचाई निधीतून भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच थकबाकीच्या रकमेवरील १.२० कोटी व्याजाची रक्कम तापी खोरे विकास महामंडळाने महावितरणशी संपर्क साधून अभय योजनेखाली माफ करवून घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या योजनांची वीज जोडणी त्वरित पुन:स्थापित करून योजना कार्यान्वित करण्यात येईल. टंचाईबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. याकरिता अमळनेरचे आ. साहेबराव पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. अमळनेर तालुक्यातील सोमेश्वर १, सोमेश्वर २, गौरेश्वर, नागेश्वर, सानेगुरूजी व कपिलेश्वर या उपसा सिंचन योजनांची वीज जोडणी थकीत वीज देयकांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आली होती. जळगावमध्ये तीव्र टंचाई जाणवत असताना टंचाईग्रस्त भागातील अन्य उपसा सिंचन योजनांची थकीत व ३० जून २०१३ पर्यंतची देयके टंचाई निधीतून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तापी नदीवरील या योजना बंद असून संस्था अवसायानात आहेत. उपसा जलसिंचन संस्थांचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्व गावांना सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या उपसा सिंचन योजनांची थकीत वीज देयके टंचाई निधीतून दिल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असे आ. पाटील जिल्हा प्रशासन व शासनास कळविले होते. सोमेश्वर उपसा जलसिंचन संस्था मूळ रक्कम व व्याज धरून ७९२३५०.२४, गौरेश्वर उपसा जलसिंचन संस्थेची ६९,३४३५४, नागेश्वर उपसा जलसिंचन संस्था ७२७७०९२, कपिलेश्वर उपसा जलसिंचन संस्था १६६३१००.०८ अशी एकूण १ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील मूळ थकीत असणारी ४६.८७ लाख रुपयांची रक्कम टंचाई निधीतून दिली जाणार आहे.