बुलढाणा जिल्ह्य़ाच्या सातपुडा कुशीतील अंबाबरवा अभयारण्यात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. या शिकाऱ्यांच्या एका टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकोट वन्यजीव विभागाच्या एका पथकावर या टोळीने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून वन्यजीव विभागाच्या पथकालाही दोनदा गोळीबार करावा लागला. अंबाबरवा अभयारण्यात बोरमाळ बीटमध्ये घडलेल्या या थराराने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर शिकारी टोळीतील तिघे पळून गेले. टोळीतील गण्या भदऱ्या चंगळ (३५) हा मात्र सापडला, परंतु त्यानेही पथकातील कर्मचाऱ्यांशी झटापट करून पळून जाण्यात यश मिळविले. मात्र त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे मिळविण्यात पथकाला यश आले.
अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत येत असलेल्या अंबाबरवा राखीव अभयारण्यातील बोरमाळ बीटमध्ये सोमवारी रात्री वनरक्षक के.एन.सलामे हे गस्तीवर होते. त्यावेळी अभयारण्यात वन्यप्राण्यांची शिकार करणारी एक सशस्त्र टोळी दाखल झाली. सलामे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी एस.जी.खान यांना यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. अभयारण्यात ही टोळी सर्च लाईटद्वारे वन्य प्राण्यांचा शोध घेत असतांना वन परिक्षेत्राधिकारी खान खात्याच्या पथकाद्वारे त्याठिकाणी हजर झाले. शिकारी टोळयांना जेरबंद करण्याच्या बेतात ते असतांना टोळीकडून वन्यजीव विभागाच्या या पथकावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने त्यात कुणी जखमी झाले नाही. मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून स्वसंरक्षणार्थ वन्यजीव विभागाच्या पथकांनी देखील टोळयाच्या दिशेने गोळीबार केला. त्यातही कुणी जखमी झाले नाही. मात्र गोळीबार होताच शिकारी टोळयातील सदस्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र पथकाने गण्या चंगळ या आरोपीस पकडण्यात यश मिळविले. मात्र त्यानेही झटापट करून आपली सोडवणूक करीत तेथून धूम ठोकली. हे सर्व आरोपी फरार झाले आहेत.
वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शिकारी टोळीत प्रल्हाद धिरसिंग सरदार, काल्या रघुसिंग सरदार, अशोक नंदा सरदार व चंगळ हे सामील असून ते मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्य़ातील पाचोरी येथील आहेत. ते अवैध देशी कट्टे व इतर शस्त्रे घेऊन वन्यप्राण्यांची शिकार करतात. वन्यप्राण्यांचे मास व अवयव तस्करीचा त्यांचा प्रमुख व्यवसाय असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिकारी टोळ्यांना हुसकावून लावण्याच्या या कारवाईत वन्यजीव विभागातील जी.व्ही.अढाव, सोळंके, ससाने, चव्हाण, मेहेंगे, नारखेडे, सलोने यांनी सहभाग घेतला.
अंबाबरवा अभयारण्य मध्यप्रदेश व बुलढाणा जिल्ह्य़ातील सातपुडय़ातील सीमावर्ती भागात आहे. या अतिशय दुर्गम अभयारण्याचे संरक्षण आकोट वन्यजीव विभागाकडे आहे. या अभयारण्यात मध्यप्रदेशातील पाचोरी परिसरातील शिकाऱ्यांच्या सशस्त्र टोळ्या धुमाकूळ घालून वन्यप्राण्यांची श्किार करतात. अन्य वनउपजांच्या चोऱ्याही वाढल्या आहेत. यासंदर्भात या वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी मध्यप्रदेशातील खकणार येथील वन व वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. प्रकरणी महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन्यजीव विभागाकडून शिकारी टोळ्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
सातपुडय़ातील अंबाबरवा अभयारण्यात वन कर्मचारी व शिकाऱ्यांमध्ये चकमक
बुलढाणा जिल्ह्य़ाच्या सातपुडा कुशीतील अंबाबरवा अभयारण्यात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. या शिकाऱ्यांच्या एका टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकोट वन्यजीव विभागाच्या एका पथकावर या टोळीने गोळीबार केला
First published on: 05-02-2014 at 09:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skirmish in satpuda