नाशिक येथील डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब बिडकर यांचा १९ मार्च हा जन्मदिन. यानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा.
नाशिकचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कर्मयोगी व डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब तथा दत्तात्रय मल्हारराव बिडकर यांचा जन्म १९ मार्च १९१० रोजी झाला. मुळातच लढाऊ वृत्ती आणि सामाजिक ऊर्मी अंगी असल्याने त्यांनी अनेक संकटांवर, अडचणींवर मात करीत आदिवासी, दलित, ग्रामीण भागातील जनतेसाठी कार्य केले. केवळ समस्या न मांडता त्यावर काय तोडगा काढावयाचा याचाही ते संशोधक वृत्तीने अभ्यास करीत. आदिवासी, दलित समाजाच्या प्रगतीआड येणारे प्रश्न, समस्यांचा वेध घेऊन निराकरण करताना सर्व प्रश्नांचा भडिमार शासन दरबारी करून निश्चित कालावधीत त्याचा ते प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहात.
नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजाच्या न्याय्य हक्कासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी डांग सेवा मंडळामार्फत आयुष्य पणाला लावले. त्यांची विचारधारा गांधीवादी, लोकहितवादी होती. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारधारांशी त्यांचे विचार जुळत. दलित, आदिवासी जनता सुरक्षित व स्वावलंबी, सक्षम व सबल कशी होऊ शकेल याबाबत त्यांचा संघर्ष हादेखील एक चर्चेचा विषय होता. दलित व आदिवासींना मोफत व सक्तीचे शिक्षण अशी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. ‘आदिवासी सेवक दादासाहेब बिडकर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. कष्टकरी जनतेच्या व्याधी, व्यथा, अपप्रवृत्तींना दूर होण्याकरिता त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. सूक्ष्म अभ्यास, वैचारिक भूमिका, मुद्देसूद मांडणी, प्रभावी व परिणामकारक कार्य यामधून त्यांच्यातील संशोधक वृत्तीचे दर्शन होते. त्यांच्याजवळ संघटनात्मक कामकाजाची खुबी होती. त्यांच्या कामकाजात शिस्त, सुयोग्य दिशा, त्याग, प्रभावशाही नेतृत्व, निर्भीडपणे आपला आवाज उंचावून लढा देण्याची वृत्ती, न्यायासाठी व सामाजिक हितासाठी पोटतिडकीने काम, असे प्रेरणादायक गुण त्यांच्यात होते.डांग सेवा मंडळ या संस्थेमार्फत त्यांनी १९३७ पासून बालवाडी ते पदव्युत्तर विभागांतर्गत शिक्षण देणाऱ्या विविध शाळा आदिवासी व डोंगराळ भागात सुरू करून गोरगरीब मुलांकरिता आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आदिवासी, दलित कष्टकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून येणाऱ्या आवाहनांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविले. त्यांचे कार्य आजही सर्वासाठी प्रेरणादायक आहे.    – प्रा. नरेंद्र पाटील (९४२३०७०८८५)