हमाल माथाडी कामगारांसाठी विविध योजना सुरू करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा जिल्हा हमाल माथाडी कामगार पतसंस्थेचा प्रयत्न आहे, त्यातून हमालांनाही आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊन मोठे करावे असे आवाहन हमाल पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी केले.पतसंस्थेच्या वतीने मृत सभासद संजय धायगुडे यांच्या वारस पत्नी माया धायगुडे यांना आर्थिक मदतीचा धनादेश घुले यांच्या हस्ते देण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष अनुरथ कदम, मधुकर केकाण, संजय महापुरे, बाबा आरगडे आदी या वेळी उपस्थित होते. पतसंस्थेच्या विमा योजनेंतर्गत धायगुडे यांना ही मदत करण्यात आली.हमाल पंचायतीने अनेकविध उपक्रम सुरू केले. त्यात हॉस्पिटल, श्रमिक बाजार हे किराणा मालाचे दुकान तसेच अन्य अनेक उपक्रमांचा समावेश आहे. पतसंस्था हमालांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य व फीसाठीही मदत करत असते. त्याचा लाभ घेऊन हमालांना आपल्या पाल्यांना शिकवावे असे घुले म्हणाले. अध्यक्ष अनुरथ कदम यांनी प्रास्तविक केले. संजय महापुरे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर केकाण यांनी आभार मानले.