सोलापूर फिल्म सोसायटीने भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकोत्तर वर्षांचे औचित्य साधून ‘विशेष आस्वादन वर्ष’ साजरे करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सहकार्याने सत्यजित रे, राज कपूर, गुरुदत्त, अनिल विश्वास आदी प्रतिभावंतांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या दुर्मीळ चित्रपटांच्या रूपाने प्रतिभावंतांच्या आठवणींचा स्मरणरंजन सोहळा आयोजिला आहे.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वातानुकूलित अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात दि. २५ रोजी सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सत्यजित रे, राज कपूर व गुरुदत्त यांच्या आठवणींवर आधारित काही दुर्मीळ चित्रपट दाखविले जाणार आहेत, तर दि. २६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत अनिल विश्वास आणि सायंकाळी ६.१५ ते ८.१५ पर्यंत आर. डी. बर्मन यांच्या आठवणी चित्रपटांच्या रूपाने जागविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सोलापूर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल व सचिव मनोज कुलकर्णी यांनी दिली.