बँकांचे आधुनिकीकरण होत असताना निर्माण होणाऱ्या समस्यांवर कशी मात करावी, बँकांमधील गुन्हे रोखण्यासाठी काय करता येईल, रिझव्‍‌र्ह बँकेचे धोरण या सर्वाविषयी दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन आणि श्री समर्थ सहकारी बँक यांच्या वतीने येथे असोसिएशनच्या सर्व सभासद सहकारी बँकांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रrोचा आणि समर्थ बँकेचे अध्यक्ष वासुदेव रवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रास्ताविकात ब्रrोचा यांनी सहकारी बँकांमध्ये आधुनिकीकरण होत असताना महत्त्वाच्या माहितीअभावी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद केले. या संदर्भात सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. अनिल चित्रे यांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे निर्देश, कोअर बँकिंग, एटीएम बँकिंग आणि केंद्रीय प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. डिसेंबर २०१३ पर्यंत कोअर बँकिंगचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांनी लवकरात लवकर कोअर बँकिंगप्रणालीचा अवलंब मुदतीत करून घेण्याची सूचना चित्रे यांनी केली. शिरीष केतकर यांनी माहिती सुरक्षा, लेखा पद्धत, आपत्तीतून सावरणे, गुणवत्ता आणि प्रमाणपत्र या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या होत असलेल्या सायबर क्राइम व तत्सम गुन्हय़ावर नियंत्रण कसे मिळवावे, बँकेतील कर्मचाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. नागरी सहकारी बँकांना मिळणारे एक लाख रुपये विमा संरक्षण वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसन्न पांगम यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास असोसिएशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण उगांवकर, उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, हुकूमचंद बागमार, भास्कर कोठावदे, आदींसह ३० सहकारी बँकांचे सुमारे ८० अधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक रामलाल सानप यांनी आभार मानले.