राजकीय लपंडाव
 भाग दोन
विदर्भातील जुन्या-जाणत्या नेत्यांचे वय झाले असले तरी राजकारणाची ओढ सुटणे कठीण असते. त्यामुळे काहींचे वारसदार सूत्रे हाती मिळण्याच्या संधीची वाट पाहत आहेत. तर काहींनी स्वत:चा आब राखून राजकारणातील स्थान बळकट केले आहे. यात माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांचे चिरंजीव मुकुल वासनिक यांनी थेट दिल्लीपर्यंत स्वत:चा वट निर्माण करण्यात सर्वाधिक यशस्वी झाले. केंद्रातील मंत्रिपदाने त्यांच्याभोवतीचे वलय अधिक वाढले परंतु, राजीनामा द्यावा लागल्याने आता काँग्रेसची एखादी मोठी राष्ट्रीय जबाबदारी अंगावर घेण्याची तयारी त्यांनी केली आहे.
सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते व मुरब्बी राजकारणी बाबासाहेब केदारांनी मुलगा सुनीलला ज्या झपाटय़ाने राजकारणात समोर आणले तो झपाटा मोठा होता. सुनील केदार यांच्या स्वभावात आक्रमकता असल्याने त्यांनी राजकारणावर भक्कम पकड मिळविली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना आक्रमकतेला आवर घालावा लागला. मात्र, निवडणूक जिंकण्याचे फंडे त्यांच्यापासूनच शिकले पाहिजेत, अशी त्यांची हातोटी आहे. त्यामानाने केदारांचे एकेकाळचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी रणजित देशमुख यांच्या पुत्राला राजकारणाचे बाळकडू अजून पचलेले दिसत नाही.
वर्धेतील दिग्गज नेत्या दिवं. प्रभा राव यांची एकेकाळची ‘शार्प शूटर’ कन्या चारुलता राव-टोकस यांनी थेट दिल्लीपर्यंत कनेक्शन कायम ठेवून मेघेंसाठी सतत डोकेदुखी निर्माण केली आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडेंनी पुत्र शेखर शेंडे यांना स्थिर केले आहे. बुलढाण्यात आनंदराव अडसूळ यांनी कॅप्टन अभिजितला राजकारणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. पुंडलिकराव गवळींनी त्यांची कन्या भावना गवळीला थेट दिल्लीत धाडले. त्यादेखील आता स्थिरावल्या आहेत. चंद्रपुरात नरेश पुगलियांनी मुलगा राहुलच्या हाती सूत्रे देऊन मोकळा श्वास घेतला आहे. अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत आता राजकारणात मुरले आहेत. अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे पुत्र प्रंचित यांनीही आता सहकारातील स्थान बळकट केले आहे. नागपुरातील एकेकाळचे वजनदार नेते व माजी मंत्री विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पडद्याआड गेल्यासारखे वाटत होते. सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदींना राजकारणाची दिशा कळलेली नाही. त्यांची वृत्ती वडिलांसारखी मुरब्बी राजकारण्याची नाही. यातून खुद्द सतीश चतुर्वेदींना हनुमान सेनेची निर्मिती करावी लागली.  
दिवं. आमदार गोविंदराव वंजारी यांचे पुत्र अभिजीत हेच त्यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत होते. परंतु, गोविंदरावांच्या निधनानंतर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी ‘उसळत्या’ वयातच बंडखोरी केली आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागली. आता विद्यापीठाच्या राजकारणात त्यांचा जबरदस्त वट जमला आहे, यात शंका नाही. अकोल्यात बाबासाहेब धाबेकरांचे पुत्र सुनील जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरते मर्यादित आहेत. नागपूरचे विनोद गुडधे पाटलांचे अभ्यासू पुत्र प्रफुल्ल यांनी मात्र महापालिकेत स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. यासाठी प्रश्नांची जाण आणि अभ्यासू वृत्तीच त्यांना कामी आली. नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनीही त्यांचा मुलगा जितेंद्रला राजकारणात आणण्यासाठी जोर लावला आहे. परंतु, वडिलांचा मुरब्बीपणा आणि अभ्यासू वृत्ती अंगी येण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागणार आहे. अगदीच चिल्लर कार्यक्रमांनी राजकारणात स्थिरावता येत नाही. रा.सू गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई आता राजकारणात स्थिरावले असले तरी वडिलांइतपत त्यांचे कार्य नाही.
अकोल्यातील काँग्रेस नेते अजहर हुसेन यांचा मुलगा डॉ. झिशान हुसेन यांच्या दावेदारीबद्दल काँग्रेसमध्ये चर्चा रंगत नाही. सुभाष झनक यांचा मुलगा अमित झनक यांच्याबद्दल ही स्थिती कायम आहे. रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी कुणालला राजकारणात आणले आहे. युवा चळवळीच्या माध्यमातून त्यांची धडपड सुरू असते. राजकीय परिपक्वता अजून आलेली नाही. नामांतर चळवळीचे प्रवर्तक प्रो. जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीपही रिपब्लिकन राजकारणात धडपडत आहे. अमरावतीत अनंतराव देशमुखांचे पुत्र नकुल यांची तळ्यात-ना मळ्यात अशी स्थिती आहे. अकोटला सुधाकर गणगणे यांचे चिरंजीव महेश यांची एनएसयुआयच्या पलीकडे मजल गेलेली नाही. भाऊसाहेब फुंडकर यांच्या वलयात आकाश फुंडकर यांच्या राजकारण प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला नाही. नितीन गडकरींनी मात्र दोन्ही मुलांना राजकारणात आणण्याचे टाळले आहे. राजकारणाचा वारसा नसूनही अल्पसंख्याक मराठी भाषक मुस्लिम नेत्यांपैकी डॉ. शकील सत्तार यांचाही उल्लेख करावा लागेल. मुस्लिम समाजाला सुशिक्षित करण्यासाठी त्यांनी सामाजिक आणि राजकीय सामाजिक कार्यात उडी घेऊन स्वत:ची एक प्रतिमा तयार केली आहे. सिनेट सदस्य, हज कमिटी, पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभाग सदस्य अशी त्यांची वाटचाल आहे. या नव्या चेहेऱ्यांचा लपंडाव सुरू असताना विकासाचे मुद्दे भविष्यात ठोसपणे कोण मांडणार याचीही दिशा निश्चित करावी लागेल.
    (समाप्त)