पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जिल्हाभरात उग्ररूप धारण करत असतानाच प्रशासनाची चाल मात्र अतिशय धीम्या गतीची आहे.  परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता भीषण होणार आहे. पाणी चोरी आणि गळती रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी जिल्ह्य़ात लातूर, औसा या दोन तालुक्यात तसेच लातूर शहरात तीव्र बनणार आहे. धनेगाव धरणातून लातूर शहराला पाणी दिले जाते. या धरणातील पाणीसाठा गेल्या अनेक महिन्यांपासून अचल साठा पातळीपेक्षा वर आलेला नाही. कळंब, अंबाजोगाई, केज, आदी शहराबरोबरच आता मुरूड, ढोकी, लोहटा, उस्मानाबाद आदी ठिकाणी या धरणातून टँकरने पाणी नेले जात आहे. धरणातून लातूर शहरापर्यंत बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणले जात असले, तरी वाटेतील सुमारे २०० गावांत पाणीटंचाई असल्यामुळे याच पाइपलाइनचे पाणी या ना त्या प्रकारे घेतले जाते. ज्या गतीने धनेगाव धरणातून पाणी उपसा होतो आहे, त्यानुसार एप्रिलपर्यंतच हे पाणी पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रशासनाला पाणी कोठून आणावे, हा प्रश्न भेडसावणार आहे. लातूर शहरालगतच्या नागझरी बंधाऱ्यातील पाणी शहरातील पाणीपुरवठय़ासाठी आरक्षित करण्यात आले होते. या जलाशयातील पाणी शेतक ऱ्यांनी बेकायदा वीजजोडणी घेऊन उपसा सुरू केला होता. त्या उपशावर प्रतिबंध करावे यासाठी थेट महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर १५ दिवसांनी त्या भागातील वीज खंडित करण्यात आली.
पाणीपातळी स्थिर असल्याचे सिंचन विभागातून सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. मध्यरात्री बैलगाडीत डिझेलपंप ठेवून नागझरी जलाशयातील पाणी खेचले जात आहे. या जलाशयातील पाणीसाठा संपल्यानंतर अन्य बंधाऱ्यातील सुमारे १० दलघमी पाणी लातूर शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. हे पाणी नागझरी, वरवंटी, आर्वी मार्गे लातूरला दिले जाईल. पाणी दिसले की त्याची चोरी होणार हे लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, तर नव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे, असे सुज्ञ नागरिक आवर्जून सांगतात.