नवीन वर्षांतील पहिलाच महिना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी विविध क्रीडा प्रकारांची मेजवानी घेऊन येत आहे. जानेवारीत क्रीडा महोत्सवासह वेस्ट झोन महिला कबड्डी आणि अखिल भारतीय आंतर झोनल विद्यापीठ कबड्डी स्पर्धा होऊ घातल्या आहेत. राज्यपाल कार्यालयाने क्रीडा महोत्सवाची जबाबदारी नागपूर विद्यापीठावर सोपवली असून या स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते येत्या १७ जानेवारीला होणार आहे. १७ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत हा क्रीडा महोत्सव नागपुरात होईल. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून येणाऱ्या स्पर्धकांच्या भोजनाची खास व्यवस्था निविदा काढून करण्यात आली आहे. त्याची पूर्ण तयारी झाली आहे.
त्यानंतर दोन दिवसांनी पश्चिम झोनमधील महिलांच्या कबड्डी स्पर्धा २३ ते २५ जानेवारीत होणार आहेत. यामध्ये एकूण ३६ विद्यापीठांनी भाग घेतला आहे.
नागपूर विद्यापीठाचा समावेश पश्चिम झोनमध्ये येत असून यावेळी पश्चिम झोनमधील महिला कबड्डी स्पर्धाचे यजमान पदही नागपूर विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहे. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी महिलांच्या अखिल भारतीय आंतर झोनल विद्यापीठ कबड्डी स्पर्धा २०१२-१३ येत्या २७ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत घेण्यात येतील. देशभरातील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारही झोनमधील महिलांचे कबड्डीचे संघ अखिल भारतीय आंतर झोनल विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामध्ये एकूण १६ संघांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.  अश्वमेघमुळे विद्यापीठाचे मैदान तयारच असून त्याचा लाभ येत्या स्पर्धासाठी मिळणे सहज शक्य आहे.
स्पर्धाची जय्यत तयारी सुरू असून पंचांशी बोलणी सुरू असल्याचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनंजय वेळुकर यांनी सांगितले.