दहावीचा ऑनलाइन निकाल आज दुपारी जाहीर झाला असून नवी मुंबई शहराने आपली निकालाची परंपरा कायम ठेवली असून ९६.६३ टक्के निकाल लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील ४५ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. एकाच शाळेचा निकाल शून्य टक्के नोंदविला गेला आहे. निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, मित्रांच्या घरी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शहरातील तब्बल १३० शाळांमधील सुमारे १२७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदने भरली होती. त्यातील प्रत्यक्षात १२६७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १२२६४ विद्यार्थी उत्र्तीण झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळांमध्येदेखील गर्दी केली. या वेळी उत्र्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या वेळी शिक्षकांच्या भेटी घेऊन विद्यार्थी उत्र्तीण झाल्याचे सांगतानाचे चित्र शाळांमध्ये दिसत होते. या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांना कौतुकाने पाहताना कष्टाचे चीज झाल्याचे समाधान शिक्षकांच्या डोळ्यांमध्ये दिसत होते. यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उपाहारगृहामध्ये मित्रांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. काही जण महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून एकदिवसीय सहल काढण्याचे बेत आखत होते, तर काही विद्यार्थी पुढे कोणती शाखा आणि महाविद्यालय निवडावे याबाबत चर्चा करीत होते. यातच घरी फोन करून उत्र्तीण झाल्याचे सांगताना विद्यार्थी नजरेस पडत होते.