ग्रामीण विकास योजनेंतर्गत ग्रामीण आदिवासी भागांत एसटीने प्रवास करणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शासनाने मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शासनाने लाखो रुपयांच्या एसटी बसेस अनेक आगारांना पुरविल्या असून त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी लाखो रुपयांची तरतूद केली आहे. मात्र ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व एसटी आगारांनी मोफत प्रवासाची सवलत बंद केल्याने या विद्यार्थिनींवर पैसे खर्च करून प्रवास करण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी झाला तरी ठाणे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सवलतीचे पास मात्र अजून देण्यात आलेले नाहीत. यामुळे या सवलतीअंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांनी एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींची यादी एसटी आगार प्रमुखांना केव्हाच सादर केली आहे. परंतु ठाणे विभाग नियंत्रक पी. बी. जगताप यांनी मोफत प्रवास सवलतीचे पास वरिष्ठांचे आदेश आल्याशिवाय देऊ नयेत, असे आदेश ग्रामीण भागातील आगारप्रमुखांना दिल्याने विद्यार्थिनींची मोफत सेवासुविधा बंद असल्याचे वाडा आगारप्रमुख एस. टी. मालशे यांनी सांगितले.