भर दुपारी नवी पारडी परिसरात थरार
२१ प्रवासी जखमी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस रस्ता दुभाजकावर धडकून त्यात २१ प्रवासी जखमी झाले. भंडारा मार्गावरील नवीन पारडी नाक्यावर बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
माहूर ते गोंदिया ही बस (एमएच/४०/वाय/५०८४) वेगात जात होती. पारडी नाक्यावर आली डावीकडून एका वाहनाला ओलांडताना चालक गोंधळला आणि बस थेट नाक्यावर असलेल्या रस्ता दुभाजकावर आदळली. बस दुभाजकावर चढून थांबली. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवासी जोरात समोरच्या आसनावर आदळले. बस चालकाशेजारी बसलेले प्रवासी समोरची काच फोडून बाहेर फेकले गेले. समोर आदळल्या अनेक प्रवाशांच्या नाक, तोंड व डोक्यांवर गंभीर जखमा झाल्या. त्यातून रक्तस्राव सुरू झाला. प्रवासी जोरजोरात किंचाळू लागले. अनेक प्रवासी वेदनेने कण्हत होते. रक्ताने त्यांचे कपडे माखले. जागेवरून उठण्याचेही त्यांच्यात त्राण नव्हते. अपघात झाल्याचे दिसताच लोक धावले. जवळच गस्त घालत असलेल्या हवालदार हरिश्चंद्र कांबळे यांच्यासह कळमना पोलीस पथकाला जोरदार आवाज ऐकू आला. अपघात झाल्याचे दिसताच पोलिसही धावले. नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना या पथकाच्या वाहनातून मेयो रुग्णालयात नेण्यात आले.जखमींमध्ये दिनेश दौलत बनकर, किसन सीताराम बनकर, साऊबाई किरण बनकर (सर्व रा. पिपरी चुन्नी), शेषराव विश्वनाथ गुरमारे (रा. नंदनवन), सुनील महादेव कटारे (रा. नरखेड), महादेव मारुती मेश्राम, चेतन महादेव मेश्राम (रा. हिवरीनगर), रामकृष्ण लहू पातोडे (रा. सौंदर जि. भंडारा), शैलेश पांडुरंग काशीकर, मंगेश मधुकर उदापुरे, नरेंद्र मधुकर उदापुरे (रा. नवीन म्हाळगीनगर), जयप्रकाश सुरेश यादव (रा. इंदिरानगर नरसाळा), सतीश विष्णुदास बांगडकर (रा. पांढराबोडी भंडारा), जयराम गोविंद बनकर (रा. परसोडी जि. भंडारा), योगराज महादेव वाघमारे (रा. साकोली), राजकुमार भगवानप्रसाद शर्मा, राजकुमारी भगवानप्रसाद शर्मा (रा. भटेरा जि. बालाघाट), बडगुजी धुनलू मुळे, मनतुरा बडगुजी मुळे (रा. घोराड जि. वर्धा), पंकज सुरेश चुगळे (रा. स्वागतनगर नरसाळा) व नंदकिशोर महादेव निंबकर (रा. आशीर्वादनगर) यांचा समावेश आहे. या सर्व जखमींना मेयो रुग्णालयात आणल्यानंतर जखमींची संख्या पाहताच प्रशासनाने धावपळ केली. इतर वार्डातून अतिरिक्त वैद्यकीय पथक तैनात केले आणि त्वरेने उपचार केले. बस चालक आरोपी राजेश रामशिरोमणी चतुर्वेदी (रा. लक्ष्मीनगर गोंदिया) याला अपघातानंतर कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
एस.टी. बस दुभाजकावर आदळली;
भर दुपारी नवी पारडी परिसरात थरार २१ प्रवासी जखमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस रस्ता दुभाजकावर धडकून त्यात २१ प्रवासी जखमी झाले. भंडारा मार्गावरील नवीन पारडी नाक्यावर बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
First published on: 24-01-2013 at 04:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus hit divider 21 passenger injured