कोटय़वधी रुपयांचे विषय आयत्या वेळेस आणून बिनबोभाट मंजूर करण्याची परंपरा असणाऱ्या पिंपरीपालिका स्थायी समितीने शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक मात्र त्याचा ‘अभ्यास’ करूनच मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. अनावश्यक खर्चात कपात करण्याची सूचना आयुक्तांनी शिक्षण मंडळास केली असली तरी सदस्य मात्र ‘जसेच्या तसे’ अंदाजपत्रक मंजूर व्हावे, यासाठी आग्रही आहेत. त्यातच स्थायीने घेतलेल्या कथित अभ्यासूपणाच्या भूमिकेमुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
स्थायी समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंडळाचे २०१३-२०१४ चे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. तथापि, त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली नाही. यावर अभ्यास करून निर्णय घेऊ, अशी भूमिका स्थायी सदस्यांनी घेतली. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने १०५ कोटी ९५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. मंडळाने त्यात १०९ कोटी ३८ लाख रुपयांपर्यंत वाढ केली. मात्र, आयुक्तांनी १०० कोटींची तरतूद सुचवत अनावश्यक खर्चात कपात करण्याची सूचना केली. तथापि, सदस्य मात्र जसेच्या तसे मंजुरी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. या संदर्भात, स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.