राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे यंदाचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विदर्भातील ज्येष्ठ नाटय़ कलावंत मदन गडकरी आणि यवतमाळचे ज्येष्ठ गायक पुरुषोत्तम कासलीकर यांच्यासह बारा ज्येष्ठ कलावंतांना जाहीर झाले आहेत. एक लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी गुरुवारी मुंबईत ही घोषणा केली. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
नाटक विभागात मदन गडकरी, कंठ संगीतामध्यं ज्येष्ठ शास्त्रीय गायक पुरुषोत्तम कासलीकर, वाद्यसंगीतात ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे, मराठी चित्रपट क्षेत्रात हरीश जोशी, कीर्तन-समाजप्रबोधन क्षेत्रात कीर्तनकार गजाननबुवा राईलकर, तमाशामध्ये छबुताई पंढरपूरकर, शाहिरी विभागात ज्येष्ठ शाहीर कुंतीनाथ करके, नृत्य क्षेत्रात गुरू गणेश हसलजी, लोककला विभागात सुनतीनाथ जैन अन्नदाते, आदिवासी गिरीजन विभागात गणपती रामदास वडपल्लीवार आणि कलादान क्षेत्रात सुधीर मोघे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी गेल्या ५० वर्षांपासून मराठी रंगभूमीवर रंगकर्मी, संगीत सहायक, नाटय़शास्त्र अभ्यासक आणि नाटय़ दिग्दर्शक म्हणून सातत्याने काम करीत आहेत. १९७२ पासून रंगभूमीवर अनेक मराठी आणि हिंदी नाटकांचे आणि एकांकिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. राज्य नाट्य महोत्सवात जवळपास २५ वर्ष प्रादेशिक केंद्रावर यशस्वीपणे सादर केलेल्या ९ नाटकांना निर्मितीची व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची आठ पारितोषिके मिळाली. विदर्भातील लोकप्रिय दंढार, खडीगंमत, महादेवाची गाणी, इत्यादी विविध लोककल आणि लोकजीवनाचा अभ्यास करून त्यांनी ‘पोहा चाल्ला महादेवा’ आणि ‘अरे मानसा मानसा’ या नाटकांचे प्रायोगिक पातळीवर यशस्वीपणे प्रयोग सादर केले. गेल्या ५० वर्षांपासून नाटय़कलेची सेवा करीत असताना राज्य शासनाने उतारवयात केलेला हा सन्मान माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केले अशा सर्वाच्या सहाकाऱ्याच्या प्रेमामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याची प्रतिक्रिया मदन गडकरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.