महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रविवारी (दि. ४ ऑगस्ट) शहराच्या दौ-यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील महिलांचा मेळावा तसेच‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ते पदाधिका-यांशी चर्चाही करतील.
सांगली महापालिकेत काँग्रेसने एकहाती मिळवलेल्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसने आता नगर महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. महिन्यापूर्वीच ठाकरे यांनी मुंबईत काँग्रेस पदाधिका-यांची बैठक घेऊन नगरमधील पक्षसंघटनेस निवडणुकीसाठी आवश्यक ती ताकद दिली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे व माजी नगरसेवक आसाराम कावरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जिल्हा काँग्रेसची (ग्रामीण) मासिक बैठक आज जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष ठाकरे दि. ४ रोजी नगरमध्ये येत असल्याची माहिती दिली. महिला मेळाव्यास महिला व बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे उपस्थित राहणार आहेत. मेळावा दुपारी १ वाजता यशवंतराव सहकार सभागृहात होईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हॉटेल नटराजच्या प्रांगणात इफ्तार पार्टीस ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत ब्लॉक समित्यांमधील समन्वयासाठी, १९ प्रभारी निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत, हे निरीक्षक नियुक्तीचे अधिकार आजच्या सभेत जिल्हाध्यक्ष ससाणे यांना देण्याचा ठराव करण्यात आला. सभेस राजेंद्र नागवडे, संपत म्हस्के, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, विक्रम देशमुख, सचिन गुजर तसेच तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्षांनी पक्षकार्याचा आढावा सादर करताना विविध अडचणीही मांडल्या.
 तालुक्यांची बैठक मुंबईत
तालुकानिहाय प्रश्नांसाठी दर दोन महिन्यांनी, प्रत्येकी दोन तालुक्यांतील पदाधिका-यांची मुंबईत कृषिमंत्री विखे व महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याची अभिनव कल्पना जिल्हाध्यक्ष ससाणे राबवणार आहेत. त्याची सुरुवात पुढील आठवडय़ात कर्जत, जामखेड व श्रीगोंदे तालुक्यापासून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 विशेष कार्यकारी अधिकारी पुन्हा रेंगळणार
विशेष कार्यकारी अधिकारी पदांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच सरकारने आता पदासाठी किमान १२ वी उत्तीर्णची अट लागू केली आहे. पदांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांच्या नावाच्या यादीची शिफारस केली होती. परंतु १२ वी उत्तीर्णच्या अटीमुळे आता त्यातील किमान २ हजार नावे वगळली जातील, अशी शक्यता जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी व्यक्त केली. यादीतील केवळ ५०० जणांचीच नावे कायम होतील, पुन्हा नव्याने नावे पाठवावी लागतील, असे ससाणे म्हणाले.