एसटीच्या स्वारगेट बसस्थानकातून एसटी पळवून नेत शहरातील रस्त्यांवर ती बेदरकारपणे चालवित आठ जणांचा बळी घेतल्याच्या खटल्यात बसचालक संतोष माने याचा न्यायालयात जबाब नोंदविण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले.
जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात येत आहे. या प्रकरणात मागील वर्षभरात बारा वेळा सुनावणी घेण्यात आली. त्यात ३९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी राजेंद्रसिंह मोहिते यांची नुकतीच साक्ष नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी न्यायाधीशांनी माने याला एकूण ६६ प्रश्न विचारले. मात्र, २५ जानेवारी २०१२ रोजी आपण बस चालविली नाही व आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अपघात, नुकसान झाले नसल्याचे उत्तर माने याने न्यायालयात दिले.
एसटी महामंडळात कधी रुजू झाल्याबाबत न्यायाधीशांनी प्रश्न विचारला असता, ११ ते १२ वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाल्याचे माने याने सांगितले. सेवेच्या कालावधीत त्याच्याकडून किती वेळा अपघात झाल्याचा प्रश्न विचारला असता, एकदाही अपघात झाला नसल्याचे त्याने सांगितले. घटनेच्या दिवशी २५ जानेवारी २०१२ रोजी घडलेल्या प्रसंगाविषयी विचारले असता, आपल्याला काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्याने दिले. कारागृहात आपल्याला १२ लोकांमध्ये उभे करून ओळख परेड घेण्यात आल्याचे मानेने सांगितले. मात्र, ओळख पटविण्यासाठी समोर पोलीस असल्याचे माहीत नव्हते, असाही तो म्हणाला.
मानेचा पुढील जबाब ३० जानेवारीला नोंदविण्यात येणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार काम पाहत असून, बचाव पक्षाच्या वतीने धनंजय माने काम पाहत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
न्यायालयात संतोष मानेचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू
एसटीच्या स्वारगेट बसस्थानकातून एसटी पळवून नेत शहरातील रस्त्यांवर ती बेदरकारपणे चालवित आठ जणांचा बळी घेतल्याच्या खटल्यात बसचालक संतोष माने याचा न्यायालयात जबाब नोंदविण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले.
First published on: 25-01-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement registration work started of santosh mane in court