बंदरामार्गे देशातून निर्यात होणाऱ्या तसेच विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मालांच्या चोरीच्या घटनांत वर्षभरात उरण परिसरात वाढ झाली असून या चोरी प्रकरणात वाहनचालक तसेच त्यांचे गुन्हेगारीशी असलेले संबंध उघड झाले आहेत. या वाढत्या घटनांमुळे बंदरातील व्यवसायावरच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या घटना टाळण्यासाठी चालक, ट्रान्स्पोर्टर, माल मागविणारे यांनी वेळीच दक्ष राहून नियंत्रण केल्यास मालचोरीला आळा बसू शकतो, अशी सूचना पोलिसांकडून केली जात असली तरी या व्यवसायातील अतिप्रचंड उलाढाल या घटना टाळू शकतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या वाढत्या घटनांमुळे बंदर व्यवसायही बदनाम होऊ लागला आहे.
मुंबई बंदराला पर्याय म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी उरण परिसरात जेएनपीटी या नव्या अत्याधुनिक बंदराची निर्मिती करण्यात आलेली आहे. या बंदरातून वर्षांकाठी ४५ लाख कंटेनरमधून देशी-विदेशी व्यापाराची उलाढाल केली जात आहे. बंदरात आयात होणारा तसेच बंदरातून निर्यात करण्यात येणारा माल प्रथम सीएफएसला (गोदामात) आणला जातो. त्याची सीमा शुल्क विभागाकडून तपासणी केली जाते, त्यानंतर आयात व निर्यात केली जाते. मागील वर्षभरात जगातील विविध देशांतून मागविण्यात आलेला माल गोदामातून बाहेर पडल्यानंतर मालकाच्या गोदामापर्यंत पोहोचविला जात असताना त्याची रस्त्यातच चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी उरण तसेच न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांपासून ते कोटीच्या घरातील मालाची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे अनेक चोरीच्या घटनांमध्ये ज्या कंटेनरमधून मालाची चोरी झालेली असते त्याचे सील तुटलेले नसते. ते तसेच असते, असेही निदर्शनात आलेले आहे.
नुकतीच उरण पोलीस ठाण्यात तुर्भे एमआयडीसीमधील एका व्यापाऱ्याने परदेशातून मागविलेल्या लवंगांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. हा माल जहाजातून उतरल्यावर त्याचे वजन करण्यात आले तेव्हा वजन बरोबर होते. मात्र माल मालकाच्या गोदामात पोहोचला तेव्हा दीड टन माल कमी होता. दरम्यान, वाहनचालक वाहनामध्ये असतानाही चोरी झाली असून कंटेनरचे सील कायम आहे. त्यामुळे चोरीचा माल कसा चोरला गेला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. अशा प्रकारच्या वर्षभरात ४२ घटना घडलेल्या आहेत. यापैकी कंटेनरसह मालचोरीच्या ३२ घटनांपैकी २४ घटनांचा तपास पोलिसांनी लावला आहे; तर ट्रेलर्स चोरीच्या १० पैकी ५ प्रकरणांत पोलिसांना यश आल्याची माहिती न्हावा-शेवा पोलीस विभागाचे पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. त्याचप्रमाणे या घटनांना आळा घालण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने मालाचे वजन, कंटेनरचे स्कॅनिंग, ट्रान्सपोर्टरकडून वाहनचालकांची माहिती घेणे, वाहनाला जीपीएस सुविधा पुरविणे, कंटेनर पुरविणाऱ्या शिपिंग कंपन्यांनी कंटेनरची सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे आदीची दक्षता घेतल्यास चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.