राजकीय नेत्यांचे संकल्प ‘मागील पानावरून पुढे’
‘हॅपी न्यू इयर’ म्हणत नवीन वर्षांचे स्वागत करतानाच मागील वर्षी करावयाच्या राहून गेलेल्या गोष्टींची पूर्तता नवीन वर्षांत करण्याचा संकल्प बहुतेक जण करत असतात. अर्थात नवीन वर्षांतील संकल्प हा पूर्ण न करण्यासाठीच असतो, असे मानणारा एक मोठा घटक आहे. तरीही विद्यार्थी असो, कारखानदार असो, कलावंत असो, संकल्प करतच असतात. राजकीय मंडळींची तर तऱ्हाच वेगळी. जनता जनार्दनाच्या सेवेसाठी त्यांना वर्षांतील ३६५ दिवसही कमी पडत असल्याने त्यांचे बहुतेक संकल्प ‘मागील पानावरून पुढे’ या प्रमाणे दरवर्षी पुढे पुढे सरकत असतात. असेच काही संकल्प नवीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते झटण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ या मनस्थितीत ते असल्याने त्यांच्या मनीच्या गुजगोष्टी काय असू शकतील, याविषयी थोडंसं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीतील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उल्लेख होत असलेल्या उड्डाण पुलाचे काम नवीन वर्षांत पूर्ण होणे निश्चित आहे. म्हणजेच त्यांचा एक संकल्प पूर्ण होण्याची शक्यता असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने केवळ नाशिक व येवल्याचेच दौरे न करता आता नवीन वर्षांत पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांचेही वारंवार दौरे करू शकतील. किमान नवीन वर्षांत तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप कोणाकडूनही होऊ नयेत, यासाठीही ते प्रयत्नरत राहतील. नवीन वर्षांत मनसेकडूनही नाशिककरांच्या अधिक अपेक्षा आहेत. त्यामुळेच नाशिकच्या विकासाची ब्लू पिंट नवीन वर्षांत नाशिककरांना दाखविण्याचा संकल्प आ. वसंत गिते यांचा राहील. मनसेचे तीन आमदार शहरात असताना नाशिकसाठी त्यांच्याकडून कोणतेच काम होत नसल्याची टीका केली जाते. या टिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी गोदाघाटपासून रामघाटपर्यंत विकासाची गंगोत्री वाहावयास लागेल, असे काम करण्याचा त्यांचा संकल्प असेल.  नाशिकमधील मनसेच्या तिघा आमदारांमध्ये किती एकी आहे हे दाखवून देण्याचाही ते प्रयत्न करतील.
काँग्रेसचे आ. जयप्रकाश छाजेड हे आपल्या पक्षात सर्व मंडळी कशी गुण्यागोविंदाने नांदतात, प्रेमाने एकमेकांची विचारपूस करतात, यामुळे भारावले असून आपले मनोगत सर्वापुढे येण्यासाठी खंडकाव्य लिहिण्याच्या विचारात असल्याचे समजते. माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव असोत किंवा नगरसेवक दिनकर पाटील असोत, या सर्वाच्या मनात आपल्याविषयी किती प्रेम आहे, याचे रसभरीत वर्णन ते नवीन वर्षांत करणार असल्याची माहिती मिळते. महापालिका हातातून गेल्यापासून शिवसेनेचे स्थानिक नेते सैरभैर झाले असून सेनेतील सर्व बारीकसारीक गटांना एकत्र आणण्याचा संकल्प जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना करावा लागणार आहे.
सेनेत प्रत्येक गटाने दुसऱ्या गटास कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत पराभूत केले असल्याने सर्व फिट्टमंफाट झाली आहे. त्यामुळे ‘आपण सारे भाऊ’ ही भावना प्रत्येकात वाढीस लागली आहे, अशीही त्यांची समजूत असावी. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी नवीन वर्षांत शिवसेनेबरोबरचे संबंध अधिकाधिक कसे सुधारतील, याकडे लक्ष देण्याचे ठरविले असल्याचे कळते. पालिकेतील सत्तेत मनसेला साथ देऊन भाजपला नेमके काय मिळाले, याविषयी चिंतन करण्याचा त्यांचा संकल्प असू शकतो. भाजप आणि सेना यांच्या आघाडीत शिरल्याने ‘महाआघाडी’ चे स्वरूप आपल्यामुळेच मिळाल्याची समजूत करून घेणाऱ्या रिपाइंचे नेते प्रकाश लोंढे यांनी नवीन वर्षांत जिल्ह्याबाहेर राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काळजी घेण्याचा संकल्प केल्याची माहिती मिळते. आपणांसह आपली मुले सुशिक्षित असून कधी कोणाच्या अध्यात नाहीत, मध्यात नाहीत, अशी वागणूक असतानाही राजकीय दबावामुळे आपणावर कारवाई होत असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले आहे. लोंढे पिता-पुत्रांसारखी सज्जन व प्रामाणिक व्यक्तिमत्वे आजकाल अतिशय दूर्मीळ झाली आहेत. पोलीस उगाचच त्यांना त्रास देत असतात. नवीन वर्षांत हा त्रास कसा कमीत कमी होईल, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न लोंढे यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे कळते. ं