‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांसारख्या योजनांमधून ग्रामीण, दुर्गम भागातील सर्वसामान्य लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसुविधा देत असताना संबंधित यंत्रणेवर ताण येत असला तरीही कावीळ व अन्य साथीच्या रोगांना नियंत्रणात ठेवण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा यंत्रणेचा मोलाचा वाटा आहे,’ असे मत अपर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कसबा बावडा येथील सेवा रु ग्णालयात आज मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन आप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे वरिष्ठ सल्लागार दिलीप जाधव, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जे. िशदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपचारांची गरज असणाऱ्या समाजातील सर्वसामान्य रु ग्णांसाठी आरोग्य मेळावे महत्त्वाचे असतात, असे सांगून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असल्याचे दिलीप जाधव यांनी सांगितले. कुटुंब नियोजन कार्यक्रमाकडे समाजाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे सांगून जननी शिशु सुरक्षा आदी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील. यांनी तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. थोरात यांनी ‘लेक वाचवा’ विषयावर मार्गदर्शन केले.